चौकार, षटकराचा बादशहा होणार निवृत्त

जमैका : वृत्तसंस्था – तो मैदानावर असला की गोलंदाजाला धडकी भरलेली असते. त्याला कोठे चेंडू टाकावा, या विचारात अनेकदा गोलंदाजांनी एका पाठोपाठ एक वाईड चेंडू टाकल्याची अनेक उदाहरणे आहेत. तो कोणता चेंडू प्रेक्षकांमध्ये भिरकावेल, याची त्यालाही खात्री नसते. वन डे आणि टी २० क्रिकेटची प्रेक्षकांचे पुरेपूर पैसे वसूल कामगिरी करणारा हा वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू येत्या वर्ल्ड कपनंतर निवृत्त होणार आहे. ख्रिस गेलच्या निवृत्तीची माहिती वेस्ट इंडीज क्रिकेटने ट्विटरवरून दिली. ‘बस नामही काफी है’ या वर्गात मोडणाऱ्या ख्रिस गेलने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.

२१ सप्टेंबर १९७९ रोजी जन्मलेला ख्रिस गेल आता ४० वर्षाचा होत आहे. खेळपट्टीवर पळून धावा काढण्यापेक्षा एका फटक्यात चौकार, षटकार मिळविण्यावरच त्याचा नेहमी भर रहात आला आहे. इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेच्या सरावापूर्वी गेलने ही घोषणा केली आहे. जर वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडीजला चांगली कामगिरी करता आली नाही आणि ते पुढच्या फेरीत पोहचले नाही तर ४ जुलै २०१९ ला गेल निवृत्त होईल. अफगाणिस्तानविरुद्ध तो शेवटचा सामना खेळण्याची शक्यता आहे.

ख्रिस गेलचे बऱ्याच दिवसांनी आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले होते. त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी संघात घेतले आहे. वेस्ट इंडिज संघासाठी एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त शतक करणारा गेल सर्वाधिक धावा करण्यात ब्रायन लारानंतर दुसरा फलंदाज आहे. एकदिवसीय कारकिर्दीत ख्रिस गेलने २८४ सामने जिंकले आहेत. त्याने ९ हजार ७२७ धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याने २३ शतके आणि ४९ अर्धशतके केली आहेत. वेस्ट इंडीजकडून सर्वाधिक १० हजार ४०५ धावा केल्या आहेत. आपल्या तडाखेबाज फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या गेलने २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये २१५ धावांची खेळी केली होती. वेस्ट इंडीजकडून ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

गेलने १९९९ मध्ये भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून पदार्पण केले होते. त्याने १०३ कसोटी सामन्यात ७ हजार २१४ धावा काढल्या आहेत. त्याने टी २० सामन्यात १६०७ धावा केल्या आहेत. टी २० त शतक, एकदिवसीय सामन्यात द्विशतक आणि कसोटीत त्रिशतक करणारा ख्रिस गेल हा जगातील एकमेव फलंदाज आहे. इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) मध्ये त्याने कोलकत्ता नाईट राईडरतर्फे पर्दापण केले. त्यानंतर रॉयल चॅलेन्जेर बंगळुरुसाठी २०१७ पर्यंत ख्रिस गेल खेळत होता. आयपीएलमधील त्यांच्या कामगिरीमुळे त्याला सर्वाधिक प्रसिद्धी व चाहता वर्ग मिळाला.