राजस्थान : चूरू येथील गोशाळेत अचानक 80 गायींच्या मृत्यूने उडाली खळबळ, तपास सुरू

चूरू : राजस्थानच्या चूरू जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे, येथे एका गोशाळेत अचानक 80 गायींचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. माहितीनंतर घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी पोहचले होते. प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच, सरदारशहरचे तहसीलदार कुतेंद्र कंवर यांनी म्हटले की, अखेर इतक्या मोठ्या प्रमाणात गायींचा मृत्यू विषारी चारा खाल्ल्याने किंवा आजाराने झाला आहे का, याबाबत शोध घेतला जात आहे. तपासणी अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

माहितीनुसार, ही घटना सरदारशहरात बिल्युबास रामपुराच्या श्रीराम गोशाळेतील आहे. अधिकार्‍यांनुसार शुक्रवारी सायंकाळनंतर या गोशाळेत 80 गायींचा मृत्यू झाला आहे, तर काही अन्य गायी आजारी आहेत. पशुपालन आणि वैद्यकीय विभागाची पथके घटनास्थळी पोहचली होती. विभागाचे संयुक्त संचालक डॉ. जगदीश बरबड यांनी सांगितले की, गोशाळेत शुक्रवारी सायंकाळी गायी अचानक आजारी पडू लागल्या. रात्रीत 80 गायींनी जीव सोडला. आणखी काही गायी आजारी आहेत. मात्र, त्यापैकी बहुतांश गायींची स्थिती ठिक आहे. काही विषारी पदार्थ खाल्ल्याने असे झाले असण्याची शक्यता आहे. चार्‍याचे नमूणे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

पंचकुलामध्ये अचानक 70 गायींचा झाला होता मृत्यू
मागील महिन्यात पंचकुलाच्या माता मनसा देवी मंदिराच्या जवळ गोशाळेत फूड पॉयजनिंगमुळे 70 गायींचा मृत्यू झाला होता. तर, 30 गायींवर उपचार सुरू होता. सायंकाळी उशीरा बाहेरून आलेल्या व्यक्तीने गायींना खाणे दिले होते. हे खाणे खाल्ल्यानंतर गायींची प्रकृती बिघडत गेली, ज्यानंतर सकाळपर्यंत 70 गायींचा मृत्यू झाला. संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी कमिटी गठित करण्यात आली होती. यासोबतच गोशाळेत चारा टाकण्यापूर्वी त्याच्या तपासणीची आदेशही दिले होते.