‘त्या’ एन्काऊटरची सीआयडी चौकशी 

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर ग्रामीणमधील उळे गावाजवळ रविवारी पहाटे झालेल्या चकमकीची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) केली जाईल असे आश्‍वासन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी चकमकीत ठार झालेल्या विनायक काळेच्या नातेवाईकांना रविवारी दिले आहे. ग्रामीण पोलिस दलातील पोलिस अधिकारी विजय पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांची संशयित दरोडेखोरांशी चकमक झाली होती. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात विनायक काळेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काळेच्या नातेवाईकांनी पोलिसांवर आरोप केले करत जिल्हाधिकार्‍यांच्या निवासस्थानी धाव घेतली होती.

रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पारधी समाजातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसह अबाल-वृध्दांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या निवासस्थानासमोर घोषणाबाजी देण्यास सुरवात केली होती. त्यापैकी काही जणांनी अंगावर रॉकेल ओतुन सामूहिक आत्महदन करण्याचा प्रयत्न केला. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकार्‍यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले. जिल्हाधिकार्‍यांनी पोलिस अधिकारी आणि काळेच्या नातेवाईकांची बैठक घेतली. त्यामध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबाराची सीआयडीमार्फत चौकशी केली जोईल असे आश्‍वासन त्यांनी दिले.

पोलिसाच्या म्हणण्यानुसार विनायक काळे याच्याविरूध्द 3 गुन्हे दाखल असून त्यापैकी एक दरोडयाचा गुन्हा आहे. विनायक हा सध्या पोलिस भरतीची तयारी करीत असल्याचे देखील त्याच्या नातेवाईकांकडन सांगण्यात आले. रविवारी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील अधिकारी विजय पाटील आणि त्यांचे सहकारी उळे गावाजवळ गस्तीवर असताना तेथे 5 ते 6 जण संशयितरित्या हालचाली करीत होते.

पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी पोलिसांशी वाद घातला. त्यानंतर विनायक काळेने त्याच्याकडे असलेल्या हत्याराने पोलिस अधिकारी विजय पाटील यांच्या मांडी आणि हातावर वार केले. स्वसंरक्षणार्थ विजय पाटील यांनी गोळीबार केले आणि त्यामध्ये जखमी झालेल्या विनायक काळेचा मृत्यू झाला. त्यानंतर काळेच्या नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. शेवटी जिल्हाधिकार्‍यांनी प्रकरणाच्या सीआयडी चौकशीचे आश्‍वासन दिले आहे.