‘त्या’ आरोपीच्या मृत्यूप्रकरणी सीआयडी चौकशी सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अवैध दारू विक्री प्रकरणी सिंहगड पोलिसांनी अटक केलेल्या वृद्धाचा रविवारी उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू झाला. त्याचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्या मृत्यूचे कारण ऱ्हदयविकाराने झाल्याचा अभिप्राय डॉक्टरांनी दिला आहे. नियमाप्रमाणे हा मृत्यू ‘डेथ इन कस्टडी’ असल्याने या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागा (सीआयडी) कडून करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार यांनी दिली आहे.

सिंहगड रोड पोलिसांचे पथक लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी सोपान मधूकर देवकर (वय ६०, रा. आंबेगाव खुर्द) हे विनापरवाना गावठी हातभट्टी दारूची विक्री करत असल्याची माहिती नऱ्हे चौकीतील अधिकाऱ्यांना मिळाली. त्यावेळी त्यांनी तेथे छापा टाकून पोलिसांनी ५ लिटर भरलेली हातभट्टी दारू जप्त केली. त्यानंतर त्यांच्यावर मुंबई प्रोहिबिशन अक्ट कलम ६५ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना १० एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता अटक करण्यात आली. त्यांचा मुलगा आदेश सोपान देवकर (वय २३,) याला त्यांना अटक केल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर सोपान देवकर यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यांना विश्रामबाग येथील लॉकअप मध्ये ठेवण्यात आले होते.

दरम्यान ११ एप्रिल रोजी सकाळी पावणे आठच्या सुमारास सोपान देवकर यांना फिट आल्याने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांची तपासणी करून त्यांना डॉक्टरांनी तेथील आयसीयू वार्डमध्ये ठेवले. त्यानंतर प्रकृती स्थीर झाल्यावर त्यांना जनरल वार्ड क्रमांक १८ मध्ये ठेवण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. याबाबत ११ एप्रिल रोजीच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (एसी कोर्ट) शिवाजीनगर यांना सविस्तर अहवाल सादर करण्यात आला. Accelerated hypertension with alcoholic withdrawl आजारावर उपचार सुरु असल्याचे लेखी कळविले. त्यानंतर १४ एप्रिल रोजी सायंकाळी सोपान देवकर यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचे त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आले. त्यानंतर त्यांचा रात्री पावणे बाराच्या सुमारास मृत्यू झाला.

दरम्यान सोपान देवकर यांच्यावर ३ वेद्यकिय अधिकाऱ्यांच्या पॅनलने त्यांचे इन कॅमेरा शवविच्छेदन केले. दरम्यान त्यांचा मृत्यू Death due to coronary artery disease मुळे झाला असल्याचा स्पष्ट अभिप्राय दिला आहे. या प्रकरणाचा तपास नि:पक्षपातीपणे व्हावा तसेच नियमाप्रमाणे ‘डेथ इन कस्टडी’ असल्याने त्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून सुरु आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

You might also like