CID त मिळणार आता रेखाचित्र काढण्याचं प्रशिक्षण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य पोलीस दलात संशयावरून काढलेले रेखाचित्र पोलिसांना तपासासाठी मदतीचे ठरत असते. परंतु पोलीस दलाला या रेखाचित्रकारांची कमतरता भासत असल्याने आता सीआयडी (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग) हर रेखाचित्रकार तयार करणार आहेत. त्यासाठी पाच दिवसांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागात देशातील पहिल्या रेखाचित्र विभागाचे उद्घाटन राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांच्या हस्ते झाले. यावेळी सीआयडीचे प्रमुख अतिरिक्त पोलिस महासंचालक अतुलचंद कुलकर्णी, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रविण साळुंके, फत्तेसिंग पाटील, पोलिस उपमहानिरीक्षक जालिंदर सुपेकर उपस्थित होते.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेत पाच प्रशिक्षित कर्मचारी नेमणूकीस असतील अशा पद्धतीने रेखाचित्र काढण्याचे प्रशिक्षण दिले जाईल, असे जयस्वाल यांनी यावेळी बोलताना सांगितले. प्रत्येक जिल्ह्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याकरीता सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण रेखाचित्र विभाग तयार करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. गुन्हे तपासासाठी रेखाचित्रकार तयार व्हावेत, हाच अभ्यासक्रम सुरू करण्याचा उद्देश आहे. तर १५ ते २० वर्षे कालावधीपूर्वीचे गुन्ह्यातील फरार आरोपी सध्यस्थितीमध्ये कसा दिसत असेल, त्याचे विविध रुपांची रेखाचित्रे काढू शकतो़ गुन्हा करुन पसार झालेला गुन्हेगार, बेवारस मयताची किंवा डिकंपोझ झालेल्या मानवी शरीराची ओळख पटविणे, सीसीटीव्ही फुटेजमधील अस्पष्ट दिसणारी व्यक्ती, व्हिडिओ एडिटिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्याची अस्पष्टता विकसित करणे व त्यावरुन त्या व्यक्तीचे रेखाचित्र काढणे, गरज वाटल्यास त्याचे शिल्प तयार करणे असे तपास कामात सहाय्य करणारे रेखाचित्र तयार करणारे पोलिस अधिकारी व कर्मचारी तयार करण्यात येणार आहेत.

रेखाचित्र प्रशिक्षणाकरीता राज्यातून जवळपास ४० ते ५० कर्मचाऱ्यांनी तयारी दर्शविली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सीआयडीतील १० जणांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षिणार्थींना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रशस्तीपत्रक देण्यात येणार असून, प्रा. डॉ. गिरीश अनंत चरवड हे प्रशिक्षण देणार आहेत. तर इतर विद्यापीठासोबत बोलणी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. या नव्या उपक्रमाचा फायदा पोलीस दलाला होणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like