लॉकडाऊनमध्ये फोनवरून संपर्क साधून सिगारेटची विक्री करणार्‍याला कोरेगाव पार्क परिसरातून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊन काळात शहरात लपून-छापून गुटखा, सिगारेट आणि तंबाखूची विक्री करत असताना कोरेगाव पार्क परिसरात ग्राहकांना फोनवर संपर्क करून सिगारेटची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. त्याच्याकडून २२ हजारांची सिगारेट जप्त करण्यात आली.

हुसेन मोहम्मद हनिफा ( वय ४० , रा. शेहनशहा सोसायटी लेन नंबर ६ कोरेगाव पार्क) असे पकडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क मधील इमारतीखाली एकजण फोनवर सिगारेटची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने बनावट गिऱ्हाईक पाठवून खात्री केली. त्यावेळी हुसेन फोनवर सिगारेटची विक्री करीत असल्याचे दिसून आले. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन २२ हजारांची सिगारेट जप्त केली. ही कामगिरी पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक, अमोल पिलाने, संदीप साबळे पोलीस हवालदार शिंदे, गुरव यांच्या पथकाने केली.