खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपींचा ‘लॉक अप’ मध्ये आत्महत्येचा प्रयत्न

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – खंडणीच्या गुन्ह्यात अटक केलेल्य दोन आरोपींनी पोलीस कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी (दि. 25) दुपारी पिंपरी पोलीस ठाण्यात घडली. रवींद्र भागवत सातपुते (27, रा. हनुमान नगर, बारामती) आणि सुमित गोवर्धन बेरड (22, रा. कैलासनगर, पुनावळे) अशी आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आरोपींची नावे आहेत. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक ज्ञानेश्वर जाधव (54) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपुते आणि बेरड या दोघांना वाहतूक पोलिसांकडे खंडणी मागण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यामुळे ते दोघे जण पिंपरी पोलीस ठाण्यातील कोठडीत होते. रविवारी दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास आरोपींनी जीन्स पॅन्टला असलेले धातूचे बक्कल काढून त्याद्वारे हाताची नस कापून घेतली. त्यानंतर त्या दोघांनी पोलिसांना याबाबत सांगितले. पोलिसांनी त्वरित आरोपींना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले.

आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्यास पोलीस आपल्याला सोडून देतील, यासाठी आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. यामुळे त्या दोघांवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Visit : Policenama.com