‘बॉलिवूडला संपवण्याचे, इतरत्र नेण्याचे प्रकार कधीही सहन केले जाणार नाहीत’ : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर काही राजकीय नेत्यांनी तसेच प्रसारमाध्यांनी बॉलिवूडविरुद्ध बदनामीची मोहीम सुरु केली होती. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडत बॉलिवूडवर करण्यात येत असलेल्या आरोपांवर दुःख व्यक्त केलं आहे. तद्वतच “बॉलिवूडला संपवण्याचे अथवा इतरत्र नेण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाही,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील सात महिन्यापासून बंद असलेल्या राज्यातील सिनेमागृह, मल्टिप्लेक्सच्या मालकांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून चर्चा केली व लवकरच सिनेमागृहे सुरु करण्याबाबत आश्वासन दिले. ते म्हणाले, “मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिकच नाही, तर सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये हॉलिवूडच्या तोडीस तोड देणारे सिनेमे बनवण्यात येतात. या सिनेमांचा चाहतावर्ग जगभर आहे. सिनेमासृष्टी हे एक मोठे मनोरंजन उद्योग क्षेत्र असून, या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते. तर सिनेमांमुळे आपले कलाकार प्रसिद्धीस येतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ठराविक वर्गाकडून बॉलिवूडला बदनाम करण्यात येत आहे. ही गोष्ट अत्यंत वेदनादायी असून, बॉलिवूडला संपवण्याचे अथवा अन्य हलवण्याचे जे काही प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाहीत,” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिला.

सिनेमागृह सुरु करण्यासाठी हा काळ महत्वाचा – अमित देशमुख
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं की, “दसरा, दिवाळी, नाताळ या कालावधीत अनेक सिनेमे प्रदर्शित होत असतात. टाळेबंदी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये व नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सिनेमागृहे बंद करण्यात आली. आता पुन्हा सिनेमागृहे सुरु करण्यात आल्यानंतर प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी येतील. यामुळे हा काळ महत्वाचा असून, परवानगी दिल्यानंतर सिनेमा गृहांमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांची सुरक्षा आणि स्वच्छतेला महत्व असणार आहे. सिनेमागृहे सुरु झाल्यावर या क्षेत्राला गती प्राप्त होईल,” असे ते म्हणाले.