काय सांगता ! होय ‘कोट्यावधी’ रूपये कमविणारा ‘ऑफिसर’ चोरत होता ‘खाऊ’, झाला तडकाफडकी ‘निलंबीत’

लंडन : वृत्तसंस्था – पोटाची भूक भागवण्यासाठी अनेक गरिब लोक वाट्टेल ते करतात. मात्र, लंडनमधील एका कंपनीत वर्षाला कोट्यावधी कमावणाऱ्या अधिकाऱ्याला कँटीनमधील खाद्य पदार्थ चोरल्याप्रकरणी निलंबीत केल्याची घटना समोर आली आहे. हा अधिकारी कंपनीच्या कँटीनमधून सँडविच चोरत असल्याच्या आरोपावरून त्याला कामावरून निलंबीत करण्यात आले आहे. हा अधिकारी बँकिंग कंपनीच्या सीटीग्रुपच्या लंडन येथील मुख्यालयात काम करत असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. पारस शहा (वय-31) असे निलंबीत करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

पारस शहा याने कँटीनमधून आत्तापर्यंत कितीवेळा खाद्य पदार्थ चोरले हे उघड झाले नाही. पारस शहा हा या कंपनीमध्ये 2017 मध्ये कामावर रुजू झाला होता. पारस यापूर्वी एचएसबीसी येथे काम करत होता. या घटनेबाबत कंपनीने आणि पारस शहा याने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असल्याचे इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे.

पारस शहा याच्या सोबत काम करणाऱ्या दोन माजी सहकाऱ्यांनी सांगितले की, पारस हा एक यशस्वी कर्मचारी म्हणून कंपनीमध्ये ओळखला जात होता. पारस हा कंपनीत काम करणाऱ्या इतर अधिकाऱ्यांच्या पसंतीचा अधिकारी होता. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, पारस याला या कंपनीमध्ये वर्षाला 9 कोटी किंवा त्याहूनही अधिक वेतन मिळत होते. कंपनीकडून बोनस देण्याच्या अगोदरच पारसवर ही कारवाई करण्यात आली आहे. लंडनमध्ये बँकेचे नियम एकदम कडक आहेत. एखादा दोषी आढळल्यावर त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येते. पारस याच्यावर कँटीनमधून सँडवीच चोरीचा आरोप झाल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

दरम्यान, काही वर्षापूर्वी जपानच्या मिझुहो बँकेने 2016 मध्ये अशाच एका अधिकाऱ्याला निलंबीत केले होते. या अधिकाऱ्याने कंपनीत काम करणाऱ्या एका सहकाऱ्याच्या दुचाकीचे काही स्पेअर पार्ट चोरले होते. या स्पेअर पर्टची बाजारात 500 रुपये किंमत होती. चोरीच्या आरोपाखाली कोट्यावधी रुपये पगार असलेल्या या अधिकाऱ्याला बँकेने निलंबीत केले होते.