‘व्देष’ अन् ‘हिंसा’ भडकावणार्‍या पोस्टवर कारवाईस Facebook चा नकार, भाजपावर ‘मेहरबान’ झाल्याची चर्चा

पोलिसनामा ऑनलाईन – द्वेष आणि हिंसेला प्रोत्साहन देणार्‍या पोस्टवर कडक कारवाई करणार्‍या फेसबुकने भाजपा नेते आणि संबंधित काही ग्रुपबद्दल नरमाईची भूमिका घेतली आहे. व्यावसायिक वृद्धीच्या हेतूमुळे फेसबुकने हिंसेला प्रोत्साहन देणार्‍या भाजपा नेत्यांच्या पोस्टवर कारवाईस नकार दिला आहे.

द वॉल स्ट्रीट जर्नलने फेसबुकच्या कारवाई न करण्याबद्दलच्या भूमिकेचा गौप्यस्फोट केला आहे. फेसबुकच्या भारतातील वरिष्ठ कार्यकारिणीने सत्ताधारी भाजपाशी संबंधित चार नेते आणि ग्रुप यांच्यावर द्वेष पसरवणार्‍या पोस्ट संदर्भात असलेले नियम लागू करण्यास विरोध केला आहे. दुसरीकडे वस्तुस्थिती अशी आहे की, काही नेते आणि ग्रुप हिंसा भडकावण्यात आणि चिथावणी देण्यात सहभागी होते. फेसबुकच्या भारतातील पब्लिक पॉलिसी संचालक अंखी दास यांनी कर्मचार्‍यांना यासंदर्भात सूचना दिल्या. भाजपा नेत्यांवर हिंसाचार पसरवणार्‍या पोस्टवरून कारवाई केल्यास कंपनीच्या भारतातील व्यावसायिक वाढीला धोका निर्माण होऊ शकतो, रिपोर्टमध्ये म्हटले आहे. जागतिक पातळीवर फेसबुक वापरकर्त्यांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. भाजपाच्या तेलंगानातील आमदार टी. राजा सिंह यांच्या द्वेष पसरवणार्‍या पोस्टचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या पोस्टमध्ये राजा हे अल्पसंख्याकांविरोधात हिंसा करण्याचे आवाहन करत आहेत. फेसबुकमध्ये सध्या कार्यरत असलेल्या आणि माजी कर्मचार्‍यांनी सांगितलं की, अंखी दास यांचा या प्रकरणातील हस्तक्षेप हा कंपनीनं सत्ताधारी पक्षाविषयी अनुकूलता दर्शवल्याचा व्यापक स्वरूपाचा भाग आहे.