‘कोरोना’ लशीच्या नोंदणीच्या बहाण्याने गंडा, पोलिसांकडून सावध राहण्याचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसीच्या वितरणाची तयारी राज्य सरकारने सुरु केली आहे. याचा गैरफायदा सायबर चोरट्यांकडून घेत जातला आहे. नागरिकांना लशीसाठी नोंदणी करण्याच्या नावाखाली गंडा घालण्यात येत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत आहेत.

लसीसाठी नोंदणी करण्याच्या बहाण्याने फोन करुन संबंधित नागरिकाकडून वैयक्तिक माहिती घेऊन ‘आधार’ला जोडलेल्या बँक खात्यांमधून पैसे लंपास करण्याचे प्रकार वाढले आहेत. सायबर चोरट्यांकडून होत असलेल्या फसवणूकीच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांकडून नागरिकांना अशा सायबर चोट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

देशात दररोज कोरोना रुग्ण सापडत आहेत. सरकारने कोरोना लस देण्याची तयारी सुरु केली असून पहिल्या टप्प्यात डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. मात्र, या महितीपासून अनभिज्ञ असलेल्या सर्वसामान्यांना सायबर चोरटे टार्गेट करत आहेत. कोरोनाच्या भीतीचे भांडवल करुन चोरटे नागरिकांच्या पैशावर डल्ला मारत आहेत. कोरोना लशीच्या नावाखाली फसवणूक करण्याचा उद्योग चोरट्यांकडून सुरु झाला आहे. नागरिकांना फोन करुन किंवा मेसेज करुन त्यांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

– चोरट्यांच्या बोलण्यात फसू नका
– दिल्लीतील आरोग्य विभागातून बोलत असल्याच्या बहाण्याने चोरटे फोन करतात.
– लस देण्यासाठी नाव नोंदणी सुरु असून त्यासाठी आपली माहिती मागत असल्याचे सांगतात.
– नागरिकांकडून वैयक्तिक माहिती विचारून घेतात. त्यानंतर आधार क्रमांक विचारला जातो.
– आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला असेल तर ओटीपी मागितला जातो.
– ओटीपी मिळाली की खात्यांमधून पैसे काढून घेतले जातात. कधी-कधी मेसेज पाठवून माहिती पाठवण्यासाठी लिंक पाठवली जाते.

नागरिकांनी अशा फोन कॉल किंवा मेसेजना प्रतिसाद देऊ नये. चोरट्यांना वैयक्तिक आणि आपली गोपनीय माहिती तसेच ओटीपी देऊ नये. तसेच संशयास्पद लिंक उघडू नये आणि त्या पुढे पाठवू नयेत. फसवणूक झाल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार देण्याचे आवाहन सायबर सेल पोलिसांनी केले आहे.