अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांना नागरिकांकडून चोप

विरार : पोलीसनामा ऑनलाईन – अंमली पदार्थाची विक्री होत असल्याचे पोलिसांना सांगून देखील त्यांच्याकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने नागरिकांनी पुढाकार घेत दोन जणांना चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार नालासोपारा पूर्व येथील तुळींज येथे घडला आहे. नागरिकांनी अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्यंवर पाळत ठेवून दोघांना चोप दिला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामुळे अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांचे धाबा दणाणले आहेत.

तुळींज परिसरातील अंबावाडी भागात सर्रास खुलेआम अंमली पदार्थ विकले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. यावर पोलिस कारवाई करत नसल्याने दक्ष नागरिकांनी स्वत: अंमली पदार्थ विक्रेत्यांना धडा शिकवण्याचा निश्चय केला. त्‍यासाठी नागरिकांनी काही दिवस या अंमली पदार्थ विक्रेत्‍यांवर पाळत ठेवली. दरम्‍यान, आज गुरूवारी यातील दोन व्यक्‍तींना रंगेहाथ पकडून त्यांना चांगलाच चोप दिला. यानंतर या दोघांना नागरिकांनी तुळींज पोलिसांच्या हवाली केले. सर्वसामान्यांच्या या उग्र भूमिकेचा अंमली पदार्थ विक्रेत्‍यांनी चांगलाच धसका घेतला आहे.

मुंबई शहराला अंमली पदार्थांचा फार गंभीर स्वरूपाचा विळखा पडलेला आहे. या अंमली पदार्थांच्या विळख्यात प्रामुख्याने तरुण पिढी आणि त्यातल्या त्यात महाविद्यालयीन विद्यार्थी अडकले असल्याचे चिंताजनक निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला आहे. त्यामुळे हा चिंतेचा विषय झालेला आहे. मुंबई पोलिसांकडून अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांवर कारवीई करण्यात येते. तरी देखील मुंबईत अंमली पदार्थ विक्री सर्रासपणे होत आहे.