फसव्या जाहिरातींमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मूळव्याध, फिशर, भगंदर, मूत्र पित्ताशयातील खडे, हर्नीया अथवा अँपेंडिक्समुळे असह्य होणारी  पोटदुखी असो त्याचे निदान व उपचार लवकरात लवकर व तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्याची गरज आहे. वेळीच उपचार करून घेतला तर आनंददायी जीवन जगण्याची संधी प्रत्येकालाच मिळू शकते त्यासाठी यासंबंधीचे गैरसमज दूर करून सर्वांना आरोग्य साक्षर करण्याची गरज आहे. अशा आजारांबाबत रुग्ण चटकन इतरांशी बोलत नाहीत, शक्यतो गुपचूप त्रास सहन करण्याकडे किंवा ऐकीव माहितीच्या आधारे जडीबुटीचे उपचार करण्याकडे लोकांचा कल दिसून येतो. त्यामुळे अशा आजारांचे रूपांतर गंभीर आजारात होते.

अलिकडे मूळव्याध, भंगदर, हर्नीया अशा आजारांवर नेमकेपणाने उपचार करण्याची आधुनिक पद्धती विकसित झाली आहे, मात्र, जुनाट पद्धतींनी तात्पुरते उपचार करून देणार्‍या दवाखान्यांच्या जाहिराती सार्वजनिक स्वच्छतागृहात व रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होताना दिसतात. या आजाराने त्रस्त असलेले रुग्ण या जाहिरातींना बळी पडतात आणि उपचारांसाठी तिकडे धाव घेतात परंतु पदरी निराशा पडते. याविषयी अधिक माहिती देताना निरामया हॉस्पिटलचे संचालक व लॅप्रोस्कोपिक शल्यचिकित्सक डॉ अमित थडानी सांगतात, गुदद्वारातून होणाऱया रक्तस्त्रावाकडे दुर्लक्ष करू नये. त्यामुळे उपचारांना उशीर होतो. भारतातील बदललेली जीवनशैली, फास्टफूड आहारपद्धती, अवेळी खाणे, अपुरी झोप आणि  दारू व तंबाखूच्या व्यसनांमुळे आतडय़ांच्या कर्करोगाचे भारतातील प्रमाण वाढत आहे. पोटातील आजारांवर चुकीचे उपचार न करता लवकरात लवकर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, त्यामुळे भविष्यात आरोग्याच्या अनेक गुंतागुंतीच्या समस्या टाळता येतील.