घरकुल वसाहतीमध्ये टोळक्याचा ‘राडा’

पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांचा आयुक्तालयावर मोर्चा

पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी : चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरकुल वसाहत येथे दहशत निर्माण करण्यासाठी टोळक्याने दोन दुकानांची तोडफोड करत अक्षरशः राडा केला. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नसल्याने गुन्हेगार मोकाट सुटले असून चिखली पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांनी थेट पोलीस आयुक्तलयावर मोर्चा काढला. ही घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. या प्रकरणी राजेंद्र मोहन डोणगे (३९, रा. घरकुल, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. तर हर्षल विंचुरे, आकाश कोळी, अनिकेत रणदिवे, छोट्या उर्फ आकाश आणि अन्य १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिखली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र यांचे घरकुल चिखली येथे किराणा दुकान आहे. शनिवारी रात्री आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून राजेंद्र यांना कोयता, चॉपर, लोखंडी रॉड अशा शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्या दुकानाची तोडफोड केली. दुकानातील चार  हजार ७०० रुपये जबरदस्तीने घेऊन गेले. दुकानातील सामानाची तोडफोड करून नुकसान केले.  या टोळक्याने राजेंद्र यांच्या दुकानाच्या शेजारी असलेल्या दुकानातही तोडफोड केली. चिखली पोलिसांनी वीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घरकुल येथे गुन्हेगारी टोळके नेहमीच दहशत माजविण्याच्या हेतूने राडा करत असतात. पोलीस त्यावेळी किरकोळ कारवाई करुन मलमपट्टी करत असतात. मात्र पुन्हा मागचे दिवस पुढे पाहायला मिळतात. चिखली पोलिसांचे विशेषतः पोलीस ठाण्याची ओळख असणाऱ्या गुन्हे प्रकटीकरण आणि गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचे काम असणाऱ्या ‘डिबी’च्या पथकाची कसलीच वचक राहिलेली नाही. यामुळेच गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. चिखली पोलिसांच्या या नाकर्तेपणामुळे नागरिकांनी शनिवारी रात्री थेट पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेला आणि तत्काळ येथील गुन्हेगारी बंद करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर संतप्त नागरिक शांत झाले.