‘हे’ॲप निवडणूक अधिकाऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी

आचारसंहिता भंगाच्या तक्रारींसोबतच नागरिकांकडून सेल्फीसह हाय-हॅलोचे मेसेज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आचरसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार नागरिकांना करता यावी, यासाठी cVIGIL हे मोबाइल ॲप उपलब्ध करून देण्यात आले  आहे. या ॲपवरून नागरिकांना माहिती आणि फोटो काढून तक्रार पाठविता येणार आहेत. मात्र हे  ॲप काही ठिकाणी अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कारण ॲपवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारींऐवजी नागरिक सेल्फींसोबतच हाय, हॅलो आणि गुडमॉर्निंगचे मेसेजेस टाकत आहे.

आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास सी व्हिजिल ॲपच्या माध्यमातून थेट ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कॅमेरा, इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस सुविधा असलेल्या स्मार्टफोनद्वारे या ॲपच्या माध्यमातून तक्रार करता येते. आदर्श आचारसंहिता भंग होत असल्याचे वाटल्यास नागरिक त्या घटनेचे छायाचित्र किंवा २ ते ३ मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन ॲपवर टाकू शकतात. ॲप वापरकर्त्यास आपली ओळख लपवून तक्रार नोंदविण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. या प्रणालीस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र या ॲपवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारींबरोबरच नागरिकांनी सेल्फींसोबतच हाय, हॅलो आणि गुडमॉर्निंगचे मेसेजेस केले आहेत.

आता अशा लोकांवर प्रशासन आता त्यांच्यावर कारवाई करण्याचा तयारीत आहे. यासाठी करा सी-व्हिजिलवर तक्रार-यामध्ये मोबाइल नंबर आणि इतर व्यक्तिगत तपशील ॲप प्रणालीवर पाठवले जात नाहीत. त्यामुळे निनावी तक्रारीच्या बाबतीत तक्रारकर्त्यास पुढील संदेश मिळत नाहीत. मात्र त्याच्या तक्रारीवर कारवाई केली जाते. मतदारांना पैसा, मद्य, अंमली पदार्थांचे वाटप करणे, शस्त्रसाठा अथवा शस्त्रवापर, मतदारांना मारहाण, दमबाजी, चिथावणीखोर भाषण, पेड न्यूज, फेकन्यूज, मतदारांना आमीष म्हणून वस्तूंचा वापर, मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक, उमेदवाराची मालमत्ता आदी विविध प्रकारच्या आचारसंहिता उल्लंघनाच्या प्रकरणात सी-व्हिजिल मोबाइल ॲपवर तक्रार करता येईल.