Ajit Pawar : ‘Lockdown ची वेळ आली तर नागरिकांना 2 दिवसांचा वेळ दिला जाईल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी राज्यात लॉकडाऊन ऐवजी कडक निर्बंध लावले जाणार आहेत. लवकरच याबद्दल नियमावली प्रसिद्ध केली जाणार आहे. पण, लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही मात्र लावावेच लागले तर दोन दिवस आधी सांगितले जाईल. जेणेकरून लोकांना आवश्यक त्या वस्तू घेण्यासाठी, त्यांना इच्छित स्थळी जाण्यासाठी वेळ मिळेल. जेणेकरुन कोणी अडकून राहणार नाही, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. अजित पवार पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

अजित पवार यांनी सांगितले की, कोणताही कठोर निर्णय घेण्यापूर्वी नागरिकांचा विचार करण्यात येईल, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अजित पवार पुढे म्हणाले, कोरोना झाल्यानंतर सुरुवातीला नागरिक घाबरत होते, एकमेकांना भेटणे देखील टाळत होते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागील वेळी एक रुग्ण पाच जणांना बाधित करत होता. आता ही संख्या 15-20 झाली असल्याचे निर्दर्शनास आले आहे.

अजित पवार काय म्हणाले ?

– देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली आहे. यामध्ये राजकारण आणू नये अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

– पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता नाही

– पुण्यात ज्या पद्धतीने निर्बंध लागू केलेत तसेच निर्बंध सर्वत्र लागू करण्याची अनेकांची मागणी, यासंदर्भात उद्या 8 वाजता निर्णय घेतला जाईल

– लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही पण लावावेच लागले तर दोन दिवस आधी सांगितले जाईल, जेणेकरुन कोणी अडकून राहणार नाही.

– बापट यांच्यासमोर बैठकीत निर्णय झाले होते, आतली चर्चा बाहेर करायची नसते, पण सर्वांनी चर्चा करुन निर्णय घेतला.

– लॉकडाऊन कोणालाही नको आहे. पण लोक ऐकत नसतील तर पर्याय नाही, वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार निर्णय घ्यावा लागेल.

– पंढरपूरमध्ये केंद्र सरकारने निवडणूक लावलेली आहे. त्यामुळे ते क्षेत्र अपवाद आहे. केरळ, बंगालमध्येही निवडणुका आहेत. तर तिथे निर्बंध का नाहीत, असा सवाल कार्यकर्ते विचारत आहेत. पण नियम पाळून प्रचार करावा.