राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह ; उमेदवारी रद्द करण्याची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपचे प्रवक्ते जी.व्ही.एल नरसिंह राव यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यापूर्वी अमेठीतील अपक्ष उमेदवाराने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर शंका उपस्थित करत त्यांची उमेदवारी रद्द करण्याची घोषणा केली होती. याबाबतची सुनावणी सोमवारी २२ एप्रिलला होणार आहे.

तक्रारदारांनी म्हटले आहे की, २००४ मधील उमेदवारी अर्जात राहुल गांधींनी बॅक ऑफ लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केल्याचे म्हटले होते. या कंपनीची कागदपत्रे ब्रिटनमध्ये सादर करण्यात आली होती. यात राहुल गांधी हे ब्रिटन नागरिक असल्याचे म्हटले होते. भारताचे नागरिकत्व नसल्यास निवडणूक लढवता येत नाही, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

अमेठी मदतदारसंघातील अपक्ष उमेदवार ध्रुव लाल कौशल यांच्या वकिलांनी राहुल गांधी यांचे नाव राऊल विंची असून त्यांच्याकडे ब्रिटनचे नागरिकत्व असल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना अयोग्य दस्तावेज दिल्याचा दावा कौशल यांच्या वकिलांनी केला आहे. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राहुल यांनी ब्रिटनमधील कंपनीचा उल्लेख केलेला नाही. राहुल यांच्याकडे ब्रिटनचे नागरिकत्व असून त्यांच्या पदवीबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राहुल यांनी प्रतिज्ञापत्रात ज्या महाविद्यालयातून शिक्षण घेतल्याचे सांगितले आहे, त्या महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतलेले नाही, असा दावाही वकिलांनी केला आहे. वकिलांनी केलेल्या आरोपांचे आणि दाव्यांचे सर्व पुरावेही निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

उमेदवारी अर्जावर घेतलेल्या आक्षेपानंतर याबाबतची छाननी २२ एप्रिल रोजी होणार आहे. शनिवारी अमेठी मतदार संघात रिटर्निंग ऑफिस मध्ये स्क्रूटनीच्या कारवाईला सुरुवात झाल्यापासून राहुल गांधी यांचे नाव पुकारण्यात आले. त्यानंतर चार लोकांनी यावर आक्षेप घेतला. त्यानंतर राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधायला सुरुवात केली. त्यांच्या शैक्षणिक आणि नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. राहुल गांधी ब्रिटिश नागरिक आहेत का ? असे प्रश्न विचारण्यात आले.

या आक्षेपानंतर मात्र राहुल गांधी यांचे वकिल राहुल कौशिक यांनी या आरोपांचे खंडन कारण्यासाठी वेळ मागून घेतली आहे. त्यानंतर रिटर्निंग ऑफिसर यांनी स्क्रूटनीची तारीख वाढवून २२ एप्रिल करण्यात आली. रिटर्निंग ऑफिसर राम मनोहर मिश्रा यांनी यासंदर्भात एक पात्र जारी करून याबाबतची माहिती दिली आहे. राहुल गांधी यांचे नाव पुकारल्यानंतर एकामागोमाग एक क्रमश: अफजाल, सुरेश चंद्र, ध्रुवलाल, सुरेश कुमार या चार जणांनी याबाबत आक्षेप घेतला. यावर आता पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.