CJI रमणा यांच्या नावे सुरू असलेल बनावट Twitter Account अखेर बंद, ट्विटर इंडियाने घेतली तातडीने दखल
नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाइन – देशाचे 48 वे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नावाने सुरू असलेले बनावट ट्विटर अकाउंट ट्विटर इंडियाने अखेर सोमवारी (दि. 26) बंद केले आहे. दोन दिवसापूर्वीच देशाच्या सरन्यायाधीशपदाची सूत्र हाती घेतलेले न्यायमूर्ती रमणा कोणत्याही सोशल मीडियावर नाहीत. तरीही त्यांच्या नावाने एक बनावट अकाऊंट ट्विटरवर कार्यरत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीला आढळले होते. त्यामुळे ट्विटरकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ट्विटर इंडियाने बनावट अकांऊट बंद केले आहे. .
सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीला @NVRamanma नावाने आणि प्रोफाइलमध्ये सीजेआय अर्थात चीफ जस्टिस ऑफ इंडिया अशी नोंद असलेले बनावट ट्विटर हँडल असल्याचे निदर्शनास आले होते. रजिस्ट्रीने तत्काळ या विरोधात ट्विटरकडे तक्रार केली. ट्विटर इंडियानेही तातडीने या तक्रारीची दखल घेत हे बनावट अकाउंट बंद केल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली आहे. दरम्यान, सरन्यायाधीश रमणा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नसतानाही त्यांच्या नावाने असे बनावट अकांऊट चालवणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने दिल्ली पोलिसांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे.