सरन्यायाधीशांवर लैंगिक छळाचे आरोप ; ‘ते’ म्हणाले न्यायपालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या ज्यूनियर कोर्ट असिस्टंट महिलेने तिचे गोगोई यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. परंतु रंजन गोगोई यांनी आपण या आरोपांमुळे दु:खी झालो आहोत. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात आहे. यामागे मोठे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयात ज्यूनियर कोर्ट असिस्टंट म्हणून काम करत होती. तिने लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. तिने विरोध केल्यावर मात्र तिला त्रास दिला गेला आणि नोकरीवरून काढून टाकण्यात आले. ती आता सर्वोच्च न्यायालयात कार्यरत नाही. तिने यासंदर्भात न्यायालयात तक्रार दिली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. अरुण मिश्रा, संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर या तक्रारीची आज सकाळी तातडीने सुनावणी घेण्यात आली.

यावेळी सरन्यायाधीश म्हणाले २० वर्षे मी न्यायपालिकेची नि:स्वार्थ सेवा केली आहे. माझ्या खात्यात केवळ ६ लाख ८० हजार रुपये जमा आहेत. पीएफ खात्यात ४० लाख रुपये आहेत. महिलेने केलेले आरोप हे न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याला गंभीर धोका निर्माण करणारे आहेत. यामागे मोठे षडयंत्र आहे. आरोप करणाऱ्या महिलेच्या पाठीमागे मोठी शक्ती आहे. या शक्तींनी महिलेचा आधार घेत आरोप केले आहेत, असे ते म्हणाले. महिलेची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. ती चार दिवस तुरुंगात होती. तसेच तिला पोलिसांनी तंबी दिली होती, असेही ते म्हणाले.

यावर त्यांनी निर्णय देणे टाळले, तर न्या. मिश्रा आणि न्या. खन्ना यांनी माध्यमांना जबाबदारीने वागावे असे म्हणत सत्य काय आहे. याची पडताळणी केल्याशिवाय महिलेच्या आरोपांना प्रसिद्धी देऊ नये असे म्हटले आहे.