पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासंदर्भात MPSC कडून स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलीस उपनिरीक्षक भरतीसाठी जाहिरात दिली होती. मात्र, पीएसआय भरतीसाठी राखीव जागा न ठेवल्याने वंजारी समाज आक्रमक झाला. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी वंजारी युवक संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. यावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक पत्रक प्रसिद्ध केले असून यामध्ये पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

शासनाच्या मागणीनुसार विविध विभागातील भरावयाच्या पदांकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 28 फेब्रुवारी 2020 रोजी संयुक्त पूर्व परीक्षा 2020 करीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीमधील पोलीस उपनिरीक्षक भरतीसाठी राखीव जागा न ठेवल्याने वंजारी युवक संघटनेने थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात जाऊन आंदोलन केले. तसेच अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा प्रयत्न केला.

या आंदोलनानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. यामध्ये स्पष्टीकरण देताना सांगितले आहे की, शासनाच्या संबंधित विभागाकडून प्राप्त मागणीपत्राच्या आधारे महाराष्ट्र लोकसोवा आयोगाकडून जहिरात प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया राबवली जाते. मागणीपत्रामधील पदसंख्या तसेच आरक्षण हा विषय सपूर्णत: शासनाच्या अखत्यारीत असल्याने जाहिरातीमध्ये असलेली पदसंख्या तसचे आरक्षणामध्ये बदल करण्याचा अधिकार आयोगाला नसल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.