शाहांविरोधात आंदोलन न करायला ते देव आहेत का ? : ममता बॅनर्जी

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातले वैर सर्वांना माहित आहेच. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात त्याने वेगळेच वळण घेतले आहे. कोलकात्यात काल अमित शहांच्या रॅलीदरम्यान झालेल्या राड्याची ममता बॅनर्जी यांनी रात्री पाहणी करताना अमित शहांविरोधात आंदोलन न करायला ते देव आहेत का.? असे म्हटले आहे.

कोलकात्यात तुफान राडा

काल भाजप अध्यक्ष अमित शहा यांची प्रचारासाठी कोलकात्यात रॅली होती. मात्र या रॅलीला कोलकाता पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. या रॅलीदरम्यान तुफान राडा झाला. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी ‘गो बॅकचा’ नारा दिल्याने भाजप कार्यकर्ते चिडले आणि त्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडेबाजी झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी अमित शहा यांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवले. पोलिसांनी लाठीचार्ज करून कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणले.

अमित शहा गुंड

दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ममता बॅनर्जी यांनी अमित शहा यांना गुंड म्हटले आहे. मला त्यांच्या विचारधारेविषयी घृणा आहे. त्यांच्या पद्धतीचा तिरस्कार आहे, असेदेखील ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या. तर टीएमसीच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला अशी प्रतिक्रिया अमित शहा यांनी दिली आहे.

दरम्यान, यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून ममता बॅनर्जी यांच्या प्रचारावर बंदी घालण्याची मागणी देखील करण्यात आली असल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले आहे.