जयंत पाटील आणि भाजपा आ. गोपीचंद पडळकर यांच्यात भर बैठकीत खडाजंगी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – जलसंपदा खात्याचे प्रेझेंटेशन करुन काही तर वेगळे करत आहोत, हे दाखवण्याचे काम मंत्र्यांनी सांगलीत पूरस्थिती बैठक घेऊन केल्याचा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी करत निषेध नोंदवला आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील पूर नियोजन बाबतीत कोणत्याही प्रकारचे नियोजन केला नसल्याचा आरोपही आमदार पडळकर यांनी केला आहे.

तीन जिल्ह्यातील पूरस्थिती नियोजन आढावा बैठक सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीला तिन्ही जिल्ह्यातील मंत्री, खासदार,आमदार आणि लोकप्रतिनिधी यांच्यासह वडनेरे समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात तू तू मै मै झाली आहे. विचारलेल्या प्रश्नांवर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर न देता बैठक बरखास्त करण्याचा इशारा दिल्याने बैठकीतून बाहेर पडल्याचे पडळकर यांनी सांगितले.

सांगली जिल्ह्यातील 35 नदीकाठच्या गावांमध्ये बोटींची मागणी आहे. मात्र एक वर्षात त्याची पूर्तता झाली नाही, केवळ 15 बोटींच्या खरेदीचे टेंडर काढण्यात आले आहे. मात्र ज्या कंपनीकडे हे टेंडर आहे, त्यांच्याकडून जपानमधून इंजिन मागवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र अद्यापही इंजिन आले नाहीत, त्यामुळे पुराच्या आधी बोटी उपलब्ध होतील,अशी कोणतीच शक्यता नाही. तसेच जर बोटी उपलब्ध नसतील तर पुराचे काय नियोजन केला आहे, हा प्रश्न आहे ? असा सवाल देखील आमदार पडळकर यांनी उपस्थित केला आहे.