Loksabha : उमेदवाराला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये वाद

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – सतत अपमानास्पद वागणूक देणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचे सांगत काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी विरुद्ध दंड थोटपले आहेत. त्यामुळे ठाण्यातील काँग्रेसमध्ये पाठिंब्यावरुन फूट पडली आहे. आपला हेतू साध्य करण्यासाठी शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी, ब्लॉक अधिकारी व कार्यकर्त्यांना फूस लावण्याचे काम करत आहेत. हे त्यांचे षडयंत्र म्हणजे काँग्रेस आणि राहूल गांधी यांचा विश्वासघात असल्याचे पत्रक ठाणे जिल्हा इंटक काँग्रेस कमिटीने आज काढले आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज शिंदे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमुळे ठाण्यातील काँग्रेसच्या अस्तित्वाला धोका आला असल्याचे पत्रक कढले. हे पत्रक त्यांनी सर्व ब्लॉक अध्याक्षांसह प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना दिले आहे. मात्र, हा सर्व प्रकार म्हणजे विरोधकांना अप्रत्यक्ष मदत करण्याचा घाट असल्याचे पत्रक आज ठाणे जिल्हा इंटक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी काढले.

राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी कायम असून पक्ष आदेशाचे पालन करून राष्ट्रवादीचा म्हणून नव्हे तर आघाडीचा उमेदवार म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीत सर्व प्रयत्नाने काम करतील, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची व उमेदवाराची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला. दरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्येच जुंपली असल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले असून या अंतर्गत वादामुळे पक्षाची डोकेदुखी आणखी वाढली आहे.