काय सांगता ! होय, तैवानच्या संसदेत चक्क हाणामारी, अनेक सभासद झाले जखमी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कोणत्याही देशाच्या लोकप्रतिनिधींच्या सभागृहात अनेकदा विविध विषयांवर चर्चा होत असते. चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक वाद सुद्धा होत असतात. पण ही वादावादी थेट हाणामारीपर्यंत पोहचल्याचा प्रकार तैवानच्या संसदेमध्ये घडला आहे. या हाणामारीत संसदेच्या इमारतीच्या काचा फुटल्या असून, काही सभासद जखमी झाले आहेत.

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सत्ताधारी डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाचे सभासद आणि विरोध पक्ष असलेल्या कोऊमितांग पक्षाच्या सभासदांमध्ये संसदेतील नामांकनावरुन चर्चा सुरु असताना मतभेद झाले. मग दोन्ही पक्षांच्या सभासदांमध्ये सभागृहातच हाणामारी सुरु झाली. विरोधी कोऊमितांग पक्षाच्या सदस्यांनी नामांकन भरण्यासाठी जात असताना चेन चू यांना संसदेच्या मुख्य आवारात जाण्यापासून रोखलं. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली.

यामध्ये कोऊमितांग पक्षाच्या एका सदस्याला गंभीर दुखापत झाली. तसेच संसदेच्या इमारतीच्या काचांचे नुकसान झाले. तर दोन्ही पक्षांचे अनेक सभासद जखमी झाले. तैवानची ही संसद हाणामारीसाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक वेळा वादग्रस्त मुद्द्यावरुन मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. चार वर्षांपूर्वी सरकारची सुधारणाविषयक धोरणे आणि निवृत्तिवेतनातील मुद्द्यावरुन या संसदेत जोरदार हाणामारी झाली होती.