संतापजनक ! रोडरोमियोंच्या छेडछाडीला कंटाळून १० वीच्या विद्यार्थिनीने घेतला गळफास

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – दोन रोडरोमियोंकडून होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थीने राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे सोमवारी उघडकिस आली. याप्रकऱणी पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे.

वैष्णवी अशोक लव्हारे (वय १६ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. तर पोलिसांनी याप्रकरणी विनयभंग आणि पोक्सोसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकऱणी गुन्हा दाखल करत अमित साहेबराव माने (वय १९ वर्षे), रोहन गोविंद फड (वय १९ वर्षे) अशा दोघांना ताब्यात घेतले आहे.

वैष्णवीने नुकतीच इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. अमित माने आणि रोहन फड हे दोघेही गावात राहणारे आहेत. या दोघांनी वारंवार तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तर सतत तिचा पाठलाग करून चकरा मारत होते. एवढंच नाही तर दोघांनी वैष्णवी आणि तिच्या वडीलांना धमकीही दिली. या सततच्या त्रासाला कंटाळून वैष्णवीने सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गळफास घेतला. त्यानंतर कुटुंबियांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. वैष्णवीचे वडील अशोक अंबाजी लव्हारे यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी किती मुलींना जीव गमवावा लागेल

छेडछाड, वाईट नजर, यासोबत अनेक गोष्टींना महिला, तरुणींना सामोरं जावं लागतं. अनेक तरुणी, महिलांनी आपला जीव यामुळे गमविला आहे. रोडरोमियोंमुळे मुलींना अनेकवेळा प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे आणखी किती मुलींना अशा त्रासाला सामोरं जावं लागेल असा प्रश्न निर्माण होत आहे.