8 वी चा विद्यार्थी बनला ‘डॉन’, प्राचार्यास कॉल करून म्हणाला – ‘5 लाख द्या, नाहीतर संपुर्ण कुटूंबाला खल्लास करीन’

मैनपुरी :  पोलीसनामा ऑनलाइन –  उत्तर प्रदेशच्या मैनपुरी जिल्ह्यात एका प्राचार्याकडे पाच लाख रूपयांची खंडणी मागितल्याचे खुपच धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पण ही खंडणी मागणारा कुणी बदमाश किंवा गुंड नसून आठवीतील विद्यार्थी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार या 13 वर्षांच्या मुलाने आपले छंद पूर्ण करण्यासाठी प्रिंसिपलकडून पाच लाखांची खंडणी मागितली आहे. एवढेच नाही, विद्यार्थ्याने 24 तासात मागणी पूर्ण केली नाही, तर संपूर्ण कुटुंबाला मारून टाकीन, अशी धमकी सुद्धा दिली होती. पोलिसांनी विद्यार्थ्याला अटक केली आहे.

विद्यार्थ्याला पाहून पोलीस हैराण

हे प्रकरण बरनाहल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्री वर्णी इंटर कॉलेजमधील आहे. प्राचार्य बृजकिशोर यांना कुणी अज्ञात इसमाने फोन करून 5 लाखांची खंडणी मागितली आणि पैसे न दिल्यास संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली. धमकीचा फोन आल्यानंतर तोबडतोब प्राचार्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरूद्ध एनसीआर दाखल केली आणि ज्या फोनवरून कॉल आला होता तो सर्व्हिलन्सवर ठेवला. फोन नंबरची माहिती मिळताच पोलिसांनी फोन करणार्‍याला पकडले, परंतु पोलीस हैराण होते. कारण की, खंडणी मागणारा कुणी अन्य नव्हता, तर इयत्ता आठवीतील विद्यार्थी होता.

अल्पवयीनाची रवानगी पुनर्वसन केंद्रात

पोलीस चौकशीत तो सतत दिशाभूल करत होता. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला बाल न्यायालयात हजर केले असता त्यास आग्राच्या बाल पुनर्वसन केंद्रात पाठवण्याचे आदेश देण्यात आले. पोलीस ठाण्याचे प्रमुख सुरेश चंद्र शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी एकदम सराईत गुन्हेगाराप्रमाणे प्राचार्यांना फोन करून खंडणी मागत होता. तसेच प्राचार्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होता. हा विद्यार्थी श्रीमंत घरातील आहे. तो तीन भावांमध्ये सर्वात मोठा आहे. घिरोरच्या प्रायव्हेट शाळेत तो शिकतो. दोन्ही कुटुंबे एकाच परिसरात आहेत. यामुळे आरोपी आणि प्राचार्यांच्या कुटुंबियांचे संबंध चांगले आहेत.