चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांच्या निवृत्तीचे वय 60 वरून 58 करण्याच्या शिफारसींमुळं गदारोळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या सरकारी सेवेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60 वरुन 58 करण्याची शिफारस खटुआ समितीने केली आहे. त्यामुळे राज्यातील अडीच लाख चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय कमी करण्यापेक्षा सनदी अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60 वरुन 55 वर्षे केल्यास राज्य सरकारच्या तिजोरीवरील 12 कोटी रुपयांचा आर्थिक भार दर महिन्याला कमी होईल असा दावा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या महासंघाने केला आहे.

खटुआ समितीने केलेल्या शिफारशीला विरोध करताना महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी थेट सनदी अधिकाऱ्यांच्या वेतनाकडे लक्ष वेधले आहे. एका सनदी अधिकाऱ्याचे वेतन, भत्ते, दोन मोटारी, दोन चालक, दोन शिपाई, एक माळी, घरकाम करणारा कर्मचारी असा मिळून एका सनदी अधिकाऱ्यावर दर महिन्याला सुमारे चार लाख रुपये खर्च होतो. राज्यात सुमारे 300 सनदी अधिकारी असून या अधिकाऱ्यांच्या वेतनावर दर महिन्याला 12 कोटी रुपये खर्च होतात. सनदी अधिकाऱ्याचे निवृत्तीचे वय 60 वरुन 55 केल्यास राज्याच्या तिजोरीवरील 12 कोटी रुपयांचा दर महिन्याला होणारा खर्चाचा भार कमी होईल असा दावा पठाण यांनी केला आहे.

महासंघाने दिला इशारा
खटुआ समितीने दिलेला अहवाल बेजबाबदार पद्धतीने तयार असून सनदी अधिकाऱ्याने घरबसल्या मांडलेल्या काल्पनिक माहितीच्या आधारे सादर केला आहे. सनदी अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वय कमी न करता चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय कमी केल्यास राज्यात संतापाची लाट उसळेल असा इशारा महासंघाने दिला आहे.