म्हाडाकडून ‘त्या’ प्रकरणात छाया राठोड यांना क्लीन चीट

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. नितीन महाजन यांनी खोणी येथील म्हाडा प्रकल्पात भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या म्हाडा कर्मचारी छाया राठोड यांना क्लिन चीट दिली आहे. छाया राठोड यांनी आपल्या सात नातेवाईकांना एकाच सोडतीत एकाच इमारतीत घरे मिळवून दिल्याचा आरोप आमदार प्रमोद पाटील यांनी केला होता. महाजन यांनी आमदार पाटील यांना पाठवलेल्या पत्रात म्हाडाची सोडत ऑनलाइन पद्धतीने केली जात असून यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप करण्यास जागा नसल्याचे सांगत राठोड यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले आहेत.

डोंबिवलीजवळील खोणी येथे म्हाडाच्या सदनिकांचे काम सुरु असून यातील गोल्डन ड्रीम प्रोजेक्टमधील ऑर्किड इमारतीच्या सोडतीत म्हाडाच्या कर्मचारी छाया राठोड यांच्या सात नातेवाईकांना एकाच सोडतीत एकाच इमारतीत घरे मिळाल्याने यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला होता. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. या प्रकरणी म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत राठोड यांनी कोणताही भ्रष्टाचार केला नसल्याचे सांगत त्यांना क्लीन चिट दिली आहे.

म्हाडाच्या कर्मचाऱ्याला भ्रष्टाचार प्रकरणात क्लीन चिट देऊन अधिकाऱ्यांनी म्हाडाची प्रतिमादेखील स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हाडाकडून केली जाणारी सोडत संगणीकृत पारदर्शी स्वरुपाची असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याशिवाय या सोडतीत राठोड यांच्या केवळ तीन नातेवाईकांनाच घरे मिळाल्याचे नमूद केले आहे. छाया राठोड यांनी पती राजेश राठोड यांनी खोणी येथील काही भूमाफियांविरोधात तक्रारी करत आरक्षित भूखंडावर त्यांनी तयार केलेल्या डम्पिंगविरोधात लढा सुरु केल्यानेच आपल्याला आमदारांनी लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे.