मोदींना क्लीन चिट दिल्याने निवडणूक आयोगात मतभेद ; ‘त्या’ निवडणूक आयुक्तांचा बैठकांवर बहिष्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देण्यावरुन निवडणूक आयोगामधील मतभेद उघडकीस आले आहेत. पंतप्रधान मोदी यांना एका पाठोपाठ सलग सहावेळा क्लीन चिट मिळाल्याने नाराज झालेल्या निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आचार संहिता बैठकींवरच बहिष्कार टाकला आहे. आचार संहितेवरून निवडणूक आयोगाच्या होणाऱ्या बैठकीमध्ये जोपर्यंत असहमती आणि विरोध केलेल्या निर्णयाचा आदेशामध्ये समावेश केला जात नाहीत तोपर्यत बैठकीत सामील न होण्याचा निर्णय लवासा यांनी घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये अनेकवेळा आचार संहितेचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. अशोक लवासा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना आचारंसहितेचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात क्लीन चिट देण्यास विरोध दर्शवला होता. निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयामध्ये असहमती आणि विरोध केलल्या मुद्यांचा समावेश केला जात नसल्याने निवडणूक आयुक्त अशोक लवासा नाराज आहेत. निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना पत्र पाठवले आहे.

लवासा यांची मागणी –

लवासा यांनी ४ मे रोजी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, नरेंद्र मोदींना क्लीन चीट देण्यासंदर्भातील निर्णयात माझ्या मताचा उल्लेख करण्यात आला नाही. क्लीन चिट देण्याबाबतच्या निर्णयात बहुमत महत्त्वाचे असले तरी अल्पमताचाही आदेशात उल्लेख केलाच पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाच्या निर्णय प्रक्रियेसारखी निर्णय प्रक्रिया असावी अशी मागणी लवासा यांनी केली आहे. त्यामुळे अल्पमतातील मुद्दे रेकोर्डवर येतील.

वादावर मुख्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण –

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी वादाच्या चर्चेवर स्पष्टीकरण दिले आहे. निवडणूक आयोगात तीन आयुक्त असतात आणि तिन्ही आयुक्तांमध्ये मतमतांतरे असू शकतात. भूतकाळातही आयुक्तांमध्ये मतमतांतरे असल्याचे समोर आले होते. सार्वजनिक व्यासपीठावर चर्चेला मी घाबरत नाही. असे अरोरा यांनी जरी केलेल्या पत्रकात म्हंटले आहे.

घटनात्मक संस्था असलेल्या निवडणूक आयोगामध्ये तीन सदस्यीय समिती आहे. या समितीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांचा समावेश होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like