सुशिक्षीत बेरोजगारांसाठी खुशखबर ! महावितरणमधील उपकेंद्र आणि विद्युत सहाय्यकांच्या 7 हजार जागांसाठी मेगाभरती

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात झाला आहे. राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. परिणामी अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. बेरोजगारांना काम मिळावे यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहे. अनेक सरकारी उद्योगांमध्ये लांबलेली नोकर भरती पुन्हा सुरु करण्यात आली आहे. महावितरणमध्ये मोठ्या प्रमाणात नोकर भरती कारण्यात येत आहे.

महावितरणमधील उपकेंद्र सहाय्यक पदाच्या 2000 जागा आणि विद्युत सहाय्यकाच्या 5000 जगांवर भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी 4 ऑगस्ट रोजी आयोजित बैठकीत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिले. यापूर्वी 23 जूनला ऊर्जामंत्री यांनी या संदर्भात भरती करण्याचे आदेश दिले होते.

मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ही भरती लांबली होती. लांबलेली भरती प्रक्रिया आता दोन टप्प्यात राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात उपकेंद्र सहाय्यकांचे दस्तावेज तपासणी करून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर विद्युत सहाय्यक निकाल जाहीर करून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 7 हजार जागांची भरती असल्याने सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड नियमांच्या आधीन राहून ही भरती प्रक्रिया करण्यात यावी असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.