Pune News : 3000 रुपयाची लाच घेताना नगर भूमापन लिपीकासह खासगी इसम अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मोजणी झालेल्या जमीनीची हद्द कायम करुन देण्यासाठी पुरंदर उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील नगर भूमापन लिपिक आणि एका खासगी इसमाला 3 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (गुरुवार) करण्यात आली. या कारवाईमुळे भूमी अभिलेख कार्यालयात खळबळ उडाली आहे.

नगर भूमापन लिपिक प्रमोद गणेश तुपे (वय-32) आणि खासगी इसम नवनाथ पांडुरंग मेमाणे (वय-30) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तक्रारदार यांच्या जमिनीची मोजणी झाली असून जागेची हद्द कायम करुन देण्यासाठी तुपे आणि मेमाणे यांनी तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीमध्ये तीन हजार रुपये देण्याचे ठरले होते.

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सापळा रचून लिपिक प्रमोद तुपे आणि खासगी इसम नवनाथ मेमामे यांनी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.