30 हजारांची लाच स्विकारताना तहसिल कार्यालयातील लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – दाखल दाव्याच्या निकालाची प्रत देण्यासाठी 60 हजार रुपयांची लाच मागून 30 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्विकारताना पालघर तहसिल कार्यालयातील कुळवहिवाट विभागातील अव्वल कारकून आणि एका खासगी इसमास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे पालघर तहसिल कार्यालयात खळबळ उडाली आहे. ही कारवाई आज (शुक्रवार) दुपारी एकच्या सुमारास पालघर तहसिल कार्यालयात करण्यात आली.

अव्वल कारकून प्रशांत वासुदेव मेहेर (वय-53), संगणक चालक खासगी इसम हसमुख परशुराम राऊत (वय 48) असे लाच स्विकारताना रंगेहाथ पडकण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत. याप्रकरणी पालघर तालुक्यातील बोईसर येथील 53 वर्षीय इसमाने पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मंगळावारी (दि.1) तक्रार दिली होती. पथकाने पडताळणी करून आज दुपारी एकच्या सुमारास ही कारवाई केली.

तक्रारदार यांनी कूळ वहिवाटी प्रमाणे दाखल दाव्याच्या निकालाची प्रत मिळण्यासाठी तहसिल कार्यालयातील कूळ वहिवाट विभागातील अव्वल कारकून प्रशांत मेहेर यांच्याकडे अर्ज केला होता. दाव्याच्या निकालाची प्रत देण्यासाठी प्रशांत मेहेर याने तक्रारदार यांच्याकडे 1 लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीमध्ये 60 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 1 ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली. पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता ठरलेल्या रक्कमेपैकी 30 हजार रुपयांचा पहिला हप्ता आज स्विकारण्याचे मान्य केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज तहसिल कार्यालयात सापळा रचून 30 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्विकारताना संगणक चालक हसमुख राऊत आणि अव्वल कारकून मेहेर यांना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील, अपर पोलीस अधीक्षक मुकूंद हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कलगोंडा हेगाजे, भारत साळुंखे, पोलीस हवालदार कदम, पोलीस नाईक सुवारे, सुतार, पालवे, चव्हाण, सुमडा, मांजरेकर, दोडे यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

visit : Policenama.com