10 हजार रुपयांची लाच स्विकारताना भूजल सर्वेक्षण विभागाचा लेखाधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूर येथील महालेखापाल कार्यालयाकडून आलेला धनादेश देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना भूजल सर्वेक्षण विभागाच्या लेखाधिकाऱ्यास अ‍ॅन्टी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज दुपारी लेखाधिकाऱ्याच्या कार्य़ालयात सापळा रचून करण्यात आली. कौतिक यादवराव काचोळे (वय-५६) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अ‍ॅन्टी करप्शनने आठवड्यात केलेली ही तिसरी कारवाई आहे.

भूजल सर्वेक्षण विभागात कार्यरत असणाऱ्या 57 वर्षीय कर्मचाऱ्याने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारदार हे पुढील वर्षी सेवानिवृत्त होणार आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासनाकडून विशिष्ठ हक्काची रक्कम मिळते. यासाठी कर्मचाऱ्यांना कागदपत्रांची पुर्तता करावी लागले. तक्रारदार यांनी कागदपत्रांची पुर्तता केल्याने नागपूर महालेखापाल कार्यालयाकडून त्यांचा धनादेश पाठवून दिला होता. धनादेश देण्यासाठी काचोळे याने 10 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी याची तक्रार केल्यानंतर आज दुपारी काचोळे याच्या कार्यालयात सापळा रचण्यात आला.

काचोळे दुपारी कार्यालयात आल्यानंतर त्याने तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराकडून दहा हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचप प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक गणेश धोकरट, कर्मचारी विजय ब्राम्हंदे, रविंद्र आंबेकर, सुनील पाटील, चांगदेव बागुल यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.