तहसील कार्यालयातील लिपिकास 4 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शननं ‘उचललं’

सावंतवाडी : पोलीसनामा ऑनलाइन – सावंतवाडी येथील तहसील कार्यालयातील फौजदारी लिपिक पुरुषोत्तम कृष्णा वारंग (वय, ५२) यांना ४ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे. लिपिक वारंग यांनी ऐपतीचा दाखला देण्यासाठी ४ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. हि कारवाई सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कुडाळ शाखेच्या पथकाने सोमवारी केली आहे. वारंग यांच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

सावंतवाडी येथील एका वृद्ध तक्रारदार महिलेला कर्ज प्रकरणासाठी ऐपतीचा दाखला हवा होता. यासाठी तिने तेथील तहसील कार्यालयात दाखल्यासाठी अर्ज केला. त्यानंतर हा दाखला मिळावा याकरिता तो पुढील कार्यवाहीसाठी संबंधित फौजदारी विभागात पाठवण्यात आला. तिथे लिपिकपदी संशयित पुरुषोत्तम वारंग यांनी सर्व कागदपत्रे तपासून दाखला देण्याचे सांगितले. त्यानंतर वारंवार कार्यालयाच्या फेर्‍या मारून देखील त्यांनी दाखला देण्यास टाळाटाळ केली. याबाबत विचारणा केली असता त्याने थेट ४ हजाराची लाचेची मागणी केली.

यावरून सर्व कागदपत्रे उपलब्ध असताना सुद्धा दाखला न दिल्यामुळे त्या वृद्ध महिलेने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. त्यावरून त्याच दिवशी दुपारी सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि त्या लिपिकाला ताब्यात घेतले. यादरम्यान, त्या लिपिकाच्या ऑफिसमध्ये अन्य अधिकारी असल्याने लिपिक वारंग यांनी तिथे महिलेकडून लाच स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर लाचेची रक्‍कम घेऊन त्या महिलेला शहर तलाठी कार्यालयात त्यांनी बोलावून घेत लाच स्वीकारली. त्याचवेळी त्याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस उपअधीक्षक दीपक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन कुंभार, पो. हवालदार रेवणकर परब, पो. नाईक पालकर, महिला पो. कांचन प्रभू आदींच्या पथकाने केली आहे.