काय सांगता ! होय, केरळात ‘कोरोना’च्या संशयिताची माहिती देणार्‍या डॉक्टरला हॉस्पीटलनं नोकरीवरून काढलं

केरळा : वृत्त संस्था – येथील एका खासगी क्लिनिकमध्ये काम करणार्‍या एका महिला डॉक्टरने आरोप केला की, कोरोना व्हायरसच्या बंधनकारक असलेल्या तपासणीला नकार देणार्‍या एका अनिवासी भारतीय रूग्णाची माहिती अधिकार्‍यांना दिल्याने क्लिनिकच्या व्यवस्थापनाने या डॉक्टरला कामावरून काढून टाकले. डॉ. शीनू श्यामलन यांनी सांगितले की, हा रूग्ण काही दिवसांपूर्वीच क्लिनिकमध्ये आला होता आणि त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत होती. जेव्हा त्याला परदेश प्रवासाबाबत विचारले तेव्हा त्याने कतारहून आल्याचे सांगितले. परंतु, त्याने आरोग्य विभागाला आपल्या परदेश प्रवासाची माहिती दिली नव्हती.

महिला डॉक्टरने पत्रकारांना सांगितले की, जेव्हा त्या व्यक्तीला आरोग्य विभागाला आपल्या प्रवासाची माहिती देण्यास सांगितले तेव्हा त्याने नकार दिला, आणि मी कतारला परत जाणार आहे, असे त्याने सांगितले. या व्यक्तीला खुप ताप होता, म्हणून डॉ. शीनू यांनी चिंतीत होऊन ही माहिती आरोग्य विभाग आणि पोलीस अधिकार्‍यांना दिली.

डॉक्टरने सोशल मीडियावर लिहिले आहे की, ज्या अधिकार्‍यांनी रूग्णाला परदेशात जाऊ दिले त्यांना कोणती अडचण आली नाही, परंतु माझी नोकरी गेली. डॉक्टरने आरोप केला आहे की, प्रकरणाची माहिती पोलीसांना दिल्याने आणि घटनेबाबत सोशल मीडिया आणि टीव्हीद्वारे लोकांना सांगितल्याने क्लिनिक व्यवस्थापनाने तिला नोकरीवरून काढून टाकले आहे.

व्यवस्थापनाने सांगितले विचित्र कारण
डॉक्टरने सांगितले की, व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की, जर लोकांना समजले की, क्लिनिकमध्ये कोरोना व्हायरसचे संशयित रूग्ण येत आहेत, तर कुणीही उपचारासाठी क्लिनिकमध्ये येणार नाही. दरम्यान, खासगी क्लिनिकडून याबाबत अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

अधिकृत सूत्रांनी सांगितले की, त्रिशूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कलेक्टरकडे डॉ. शीनू श्यामलन यांची तक्रार केली आणि आरोप केला आहे की, डॉ. श्यामलन आरोग्य अधिकार्‍यांना बदनाम करत आहे. सूत्रांनी सांगितले की, डीएमओने कलेक्टरला सांगितले होते की, डॉ. श्यामलन यांच्याकडून रूग्णाची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य अधिकार्‍यांनी रूग्णाला परदेशात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता.