Coronavirus : ‘उवा’ मारण्याच्या औषधानं मारला जाईल कोरोना ! US मध्ये क्लिनिकल ‘चाचणी’ सुरू

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोना विषाणूचा नाश करण्यासाठी अमेरिकेत एका अशा औषधाची क्लिनिकल चाचणी सुरू झाली आहे. ज्याबद्दल जाणून घेतल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल. या औषधाने डोक्याच्या केसांमध्ये असणाऱ्या उवा मारल्या जातात. काही डॉक्टर बर्‍याच काळापासून या औषधाचा संदर्भ देत होते की या औषधाने कोरोनावर उपचार करणे शक्य आहे. आता अमेरिकेत त्याची क्लिनिकल चाचणी सुरू झाली आहे. यापूर्वी बगदाद विद्यापीठाने देखील 5 मे रोजी याची क्लिनिकल चाचणी सुरू केली होती.

या औषधाचे नाव इव्हरमेक्टिन (Ivermectin) आहे. हे औषध अमेरिकन शास्त्रज्ञांनी गेल्या महिन्यात प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत यशस्वी असल्याचे सांगितले होते. म्हणजेच त्याने प्रयोगशाळेत कोरोना विषाणूचा नाश केला होता. आता त्याची क्लिनिकल चाचणी सुरू झाली आहे. अमेरिकेतील डॉक्टरांचे म्हणणे आहे की या औषधासोबतच अ‍ॅझिथ्रोमायसिन, कॅमोस्टॅट मीसायलेट यांची देखील ट्रायल केली जाईल. यानंतर, सर्व औषधांची स्वतंत्रपणे आणि कॉम्बिनेशन स्वरूपात तपासणी केली जाईल. जे अधिक प्रभावी असेल त्याला पुढे नेले जाईल.

अमेरिकेच्या केंटकी युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसीन ची वैज्ञानिक आणि या चाचणीचे नेतृत्व करणारी डॉ. सुसैन ऑर्नाल्ड यांनी सांगितले की कोरोना विषाणूचा नाश होईल असे कोणतेही औषध अद्याप तयार झालेले नाही. तसेच कोणतीही लसदेखील तयार करण्यात आलेली नाही. म्हणून आम्हाला तीन औषधांच्या कॉम्बिनेशनचा परिणाम पहायचा आहे.

यापूर्वी 5 मे रोजी इराकमधील बगदाद विद्यापीठानेही इव्हरमेक्टिन या औषधाची क्लिनिकल चाचणी सुरू केली होती. इथे इव्हरमेक्टिन 0.2 ने जवळपास 50 रुग्णांवर चाचणी सुरू आहे. ही चाचणी ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

ऑस्ट्रेलियामधील रॉयल मेलबर्न हॉस्पिटल आणि व्हिक्टोरियन इन्फेक्शियन डिसीज रेफरन्स लॅबोरेटरीच्या शास्त्रज्ञांनी इव्हरमेक्टिनवर अभ्यास केला होता. हा अभ्यास गेल्या महिन्यात समोर आला होता. यामध्ये सांगण्यात आले की हे औषध कोरोना विषाणू नष्ट करण्यास सक्षम आहे.

ऑस्ट्रेलियाच्या अभ्यासामध्ये असे स्पष्टपणे सांगितले गेले होते की इव्हरमेक्टिन या औषधामुळे 48 तासांच्या आत कोरोना विषाणू नाश पावत आहे. वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत कोरोना विषाणूवर हे औषध टाकले होते. त्यानंतर धक्कादायक परिणाम समोर आले होते. पहिल्या 24 तासांत विषाणूची संख्या कमी होत असल्याचे प्रयोगशाळेत आढळले. पुढील 24 तासात कोरोना विषाणूचा पूर्णपणे नाश होताना दिसला. अमेरिकेच्या प्रयोगशाळेतही या गोष्टीची पुष्टी झाली आहे. आता क्लिनिकल चाचणीनंतर परिणाम काय येतील हे जाणून घेणे महत्वाचे आहे. यूएस मध्ये, इव्हरमेक्टिन औषधाच्या क्लिनिकल चाचणीसाठी 240 लोकांनी आपली नावे नोंदविली आहेत. असे सांगितले जात आहे की या औषधाच्या चाचणीचे निकाल मे 2021 पर्यंत येऊ शकतात.