तपास करणारे पोलीस अधिकारी धनंजय मुंडेंच्या जवळचे, फिर्यादी महिलेच्या वकिलांचा गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचा (Rape) आरोप करण्यात आला आहे. रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर केलेल्या आरोपामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यातच आता तक्रारदार महिलेच्या वकिलांनी गंभीर आरोप केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

तक्रारदार महिलेने केलेल्या आरोपांचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी या धनंजय मुंडे यांच्या जवळच्या असल्याचा गंभीर आरोप तक्रारदार महिलेचे वकील अ‍ॅड. रमेश त्रिपाठी यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची दुसऱ्या अधिकाऱ्याकडून चौकशी करवी अशी मागणी करणार असल्याचे त्रिपाठी यांनी सांगितले.

दरम्यान, तक्रारदार महिला रेणू शर्मा यांनी आज सकाळी डीएन नगर पोलीस ठाण्यात हजेरी लावली. रेणू शर्मा यांचा जबाब नोंदवण्यात येत आहे. पावणे बाराच्या सुमारास तक्रारदार महिला सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात आल्या.त्यांचा जबाब नोंदवून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये धनंजय मुंडे यांचा देखील जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. जबाब अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्रिपाठी यांनी दिली. ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने एसीपी मार्फत जबाब नोंदवण्यात येत आहे.