राज्यातले मदरसे बंद करून खरे हिंदुत्ववादी असल्याचं दाखवा, भाजपाच्या ‘या’ नेत्याचं मुख्यमंत्री ठाकरेंना आव्हान

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. तेव्हापासून भाजप शिवसेनेला खिंडीत पकडण्यासाठी एकही संधी सोडत नाही. आसाम मधल्या भाजप सरकारने तिथले सगळे मदरसे बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सगळे मदरसे सुद्धा बंद करुन शिवसेनेने हिंदुत्ववादी असल्याचं दाखवून द्यावं, अशी मागणी भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.

मदरश्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे आधुनिक शिक्षण न देता एका विशिष्ट धर्माचे शिक्षण देण्यात येते. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मदरसे आणि मौलवींना दिली जाणारी आर्थिक मदत तातडीने थांबवून मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात मदत करावी, असे भातखळकर यांनी म्हटलं आहे.

मदरश्यांमध्ये धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली कट्टरवादाचं शिक्षण दिले जात असल्याचं आरोप भाजप सतत करत आला आहे. शिवसेनेने भाजपला सोडून दुसरी वाट पकडल्याने दुखावला गेलेला भाजप सातत्यानं आता शिवसेनेला हिंदुत्वाबाबत प्रश्न विचार आहेत. तद्वतच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी केली होती. त्याचसोबत तुम्ही हिंदुत्व सोडून धर्मनिरपेक्ष झाला आहात का? असा खोचक सवालही उपस्थिती केला होता. त्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

दरम्यान, आमचं हिंदुत्व हे बेगडी नाही. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर असे म्हणणाऱ्याचं हसत स्वागत करणे हे आमचे हिंदुत्वाच्या बसत नाही, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना खणखणीत उत्तर दिले होते.