हर्षवर्धन पाटलांचे चुलत मेहुणे राष्ट्रवादीत

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. हर्षवर्धन पाटील यांचे चुलत मेहुणे प्रविण सोपान झांबरे, संतोष महादेव झांबरे आणि नितीन सोपान झांबरे यांनी आज बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

बारामतीत साखर कारखान्याच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजीत करण्यात आला होता. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत आले आहेत. अजित पवार यांनी तिघांचेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत केले.

पवार कुटुंबियांच्या विकासाच्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवून झांबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी यावेळी दिली. झांबरे बंधू यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशावेळी संभाजी होळकर, विश्वास देवकाते, सचिन सातव, संतोष नेवसे, अशोक नवले, बाळासाहेब गवारे, रमेश मोरे आदी उपस्थित होते.

You might also like