पाण्याने भरलेल्या मालाडमधील सब-वेत गाडीत गुदमरुन दोघांचा ‘अंत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पाणी तुंबल्याने बंद केलेल्या सबवेतून गाडी घालण्याचे धाडस दोन मित्रांच्या जीवावर बेतल्याची घटना मालाडमध्ये घडली. सबवेत फसल्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांसह, नातेवाईक आणि मित्रांना कॉल करून मदत मागितली. मात्र, मदत येईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.

इरफान खान (वय ३८) आणि गुलशाद शेख (वय ४०, दोघे रा. पठाणवाडी, मालाड) अशी त्या दुर्दैवी मित्रांची नावे आहेत. इरफान हा वाहनचालक तर गुलशाद व्यावसायिक आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मालकाची स्कॉर्पिओ घेऊन दोघेही मालाड पूर्वेकडून मालाड पश्चिमेला जाण्यासाठी निघाले होते. त्याच दरम्यान रात्री ११ च्या सुमारास स्कॉर्पिओने मालाड सबवे जवळ आले. मात्र मुसळधार पावसात मालाड सबवे पूर्णत: भरलेला होता. त्यामुळे तो बंद करण्यात आला होता.

काहींनी त्यांना पुढे जाऊ नये असा सल्ला दिल्याचे समजते. तरीदेखील त्यांनी तेथे लावलेले बॅरिकेट बाजूला करुन विरुद्ध दिशेने गाडी सबवेत घातली आणि ते मध्येच अडकले. सबवेत साचलेल्या पाण्यात गाडी बंद पडल्यानंतर गाडीचे दरवाजे उघडता न आल्यामुळे दोघेही गाडीतच अडकले. दोघांनी गाडीची काच आतून फोडण्याचा प्रयत्नही केला; मात्र त्यात ते अपयशी ठरले.

दोघांनीही मुंबई पोलीस, नातेवाईक आणि मित्रांना फोन केले. ‘आम्ही अडकलो आहोत. आम्हाला वाचवा.’ म्हणत त्यांनी मदत मागितली. मात्र मदत पोहचेपर्यंत सबवेतील पाणी वाढले. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिकांनी अथक प्रयत्नानंतर गाडी बाहेर काढली. दोघांना बाहेर काढत शताब्दी रुग्णालयात नेले. तोपर्यंत त्यांचा गुदमरून मृत्यू झाला होता.

गाडीच्या शोधासाठी ४ तास लावल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या दोघांचा कॉल येताच आम्ही १२ च्या सुमारास तेथे पोहोचलो. त्यापाठोपाठ पोलीस, अग्निशमन दल आले. आम्हाला आत सोडण्यात येत नव्हते. सुरुवातीला ४ तास त्यांनी गाडी शोधण्यासाठी लावले, असा आरोप इरफानचा भाऊ फैजल खान यांनी केला.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी गाडी आत नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. यावरून वादही झाले. तेव्हा आमच्यापैकी सलमान नावाच्या तरुणाने १० फूट पाण्यात पोहत जाऊन आत गाडी आहे याचा शोध घेतला. त्यानंतर १५ मिनिटांत आम्हीच त्यांना गाडीबाहेर काढल्याचा आरोप दोघांच्या नातेवाइकांनी केला आहे.

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी सेवन करा, आरोग्य सुधारेल

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

सर्दीची ‘अ‍ॅलर्जी’ का होते ? जाणून घ्या यामागील कारणे

पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ