पुढील दोन दिवस शेगाव-देवरी मार्ग वाहतुकीसाठी बंद : जिल्हाधीकारी

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन (अमोल वारणकर) – शेगाव-अकोट रोडवरील कवठा येथे उभारण्यात आलेल्या कवठा बेरेज प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. या धरणाच्या बॅकवाटरमुळे मागे असलेल्या मन नदीवरील लोहारा येथील पूल पाण्याखाली गेला आहे. पुलावर पाणी आल्याने पुढील दोन दिवस या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून यामार्गावरील वाहतूक मनसगाव मार्गे वळवण्यात आली असल्याचे जिल्हाधीकारी कार्य़ालयाकडून कळवण्यात आले आहे.

कवठा प्रकल्पामध्ये मागील वर्षी पडलेल्या पावसामुळे 70 टक्के भरला होता. मात्र, यंदा जास्त पाऊस झाल्याने हा प्रकल्प 100 टक्के भरला आहे. या प्रकल्पात जमा झालेले अतिरीक्त पाणी मन नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कवठा प्रकल्पाची 242.50 मी पर्यंत जलसाठ्याची क्षमता आहे. प्रकल्पाची संचय पातळी नियोजीत करण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे.

शेगाव देवरी मार्गावरील वाहतूक मनसगाव मार्गे वळविण्यात आली असून, याबाबत जिल्हा पोलीस प्रशासन, बाळापूर तहसिलदार, गटविकास अधिकारी, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग, राज्य परिवहन मंडळ अकोला, आरटीओ यांना आवशकत्या सुचना आणि उपाययोजना करण्यास जिल्हाधीकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. पुलावर पाणी आल्याने नागरिकांनी या मार्गावरून न जाता पर्य़ायी मार्गाचा वापर करावा असे कळवण्यात आले आहे.