‘या’ दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात पाणीकपात सुरू असुन, येत्या गुरुवारी 7 फेब्रुवारी रोजी शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा केंद्राची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी हा पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे कारण महापालिकेने पुढे केले आहे.

गेल्या आठवड्यात महापालिका आयुक्तांनी दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यावेळी त्यांनी पाणीकपात केली जाणार नाही असेही नमूद केले होते. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पाणी पुरवठा देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवला जात आहे. या गुरुवारी ता. 7 रोजी पाणी पुरवठा बंद आणि ता. 8 रोजी ( शुक्रवारी ) शहराला कमी दाबाने आणि उशिरा  पाणीपुरवठा होणार आहे. महापालिकेच्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्र वडगाव जलकेंद्र वारजे जल केंद्र एस एन डी टी चतुशृंगी लष्कर जलकेंद्र नवीन होळकर पंपिंग स्टेशन आदी ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. असे महापालिकेने कळविले आहे. यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.