Coronavirus : खासगी रूग्णालय बंद करून डॉक्टर कोरोनाविरूध्दच्या लढाईत सक्रिय

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे लॉकडाउनच्या कालावधीत अनेकजण विविध मार्गाने पैसा कमविण्यास पृाधान्य देत आहेत. दुसरीकडे मात्रा, स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय आणि खासगी रुग्णालय बंद करुन वाई येथील एका हृदयविकार-मधुमेह तज्ज्ञ डॉक्टरांनी सातारा जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांवरील उपचार सुुरु केले आहेत. डॉ महेश मेणबुधले असे त्यांचे नाव आहे.

दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने वैद्यकीय व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. रुग्णालये, सुविधा, डॉक्टर, परिचारिका, अन्य कर्मचारी यांचे प्रमाणही खूपच नगण्य असल्याने उपचारावर खूपच मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. मेणबुधले हे करत असलेल्या सेवेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. डॉ. मेणबुधले हे वाईतील प्रसिद्ध हृदयविकार आणि मधुमेह तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. तीन महिन्यांपूर्वी त्यांनर वाईत रुग्णालय सुरू झाले होते. हे रुग्णालय बंद करून त्यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत सरकारी आरोग्य व्यवस्थेशी स्वत:ला जोडून घेतले आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या या डॉक्टरांनी यापूर्वी 14 वर्ष राज्य शासनाच्या आरोग्य सेवेत काम केलेले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ तापोळा व कांदाटी खोर्‍यासह, कवठे (वाई) आदी ग्रामीण भागात त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली आहे. वाईच्या मिशन रुग्णालयातही त्यांनी रुग्णसेवा केली आहे. सेवाभावी वृत्ती आणि मधुमेह-हृदयरोगतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख असल्याने त्यांच्याकडे रुग्णांची सतत गर्दी असते. नुकतेच त्यांनी वाईत स्वत:चे अद्ययावत रुग्णालय उभारले आहे.

कोरोना झालेल्यांमधील मधुमेह आणि हृदयविकार असणार्‍या रुग्णांची विशेष काळजी घ्यावी लागते. सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल होणार्‍या या अशा रुग्णांवर सध्या डॉ. मेणबुधले हे उपचार करत आहेत. जिल्हा रुग्णालयात याबाबत तज्ज्ञ डॉक्टर नसल्याची माहिती मिळताच डॉ. मेणबुधले यांनी स्वत:चे रुग्णालय बंद करुन सरकारी रुग्णालयात रुग्णसेवा सुरु केली आहे.