सांगली : भिवघाटातील कापड दुकानाला भीषण आग, ८८ लाखांचे नुकसान

विटा : पोलीसनामा ऑनलाईन – शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या कापड दुकानाच्या आगीमध्ये दुकानाताली ८८ लाखांचा माल जळून खाक झाला. ही आग आज (शनिवार) सकाळी सातच्या सुमारास लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. आग विझवण्यासाठी विटा आणि तासगाव येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तास पाण्याचा फवरा मारुन आग आटोक्यात आणली. याबाबत विटा पोलीसात दुकानमालक प्रवीण शहाजी पाटील (रा. हिवतड रा. आटपाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवतड येथील प्रवीण पाटील यांनी भिवघाट येथे गेल्यावर्षी श्री साई गारमेंट या नावाने कापड दुकान सुरू केले आहे. या दुकानात लहान मुलांचे कपडे, रेडमेड कपडे, साड्या, शुटींग, शर्टींगचे गोडावून केले होते. शनिवारी सकाळी प्रवीण पाटील हे कोल्हापुरला कापड खरेदीसाठी निघाले होते. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भिवघाटमार्गे जाताना दुकानात विसरलेले चेकबुक नेण्यासाठी पाटील यांनी दुकान उघडले. त्यावेळी दुकानातून धुर येत असल्याचे त्यांना दिसले. याची माहिती पवार यांनी शेजाऱ्यांना दिली.

प्रवीण पाटील यांच्यासह शेजार्‍यांनी दुकानाची खिडकी उघडून पाहिले असता लाईटचे शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या पडत असल्याचे दिसून आले. लोकांनी महावितरण कंपनीला कळवून वीज पुरवठा बंद करण्यास सांगितले. तसेच विटा, तासगाव आणि सांगली महापालिकेच्या अग्निशमन दलास आग लागल्याची माहिती देण्यात आली. सुमारे तासाभरात अग्निशामक दाखल झाले. तीनसातांच्या अथक परिश्रमाने ही आग आटोक्यात आणली. परंतू आगीने प्रचंड रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
सुमारे तीन तासानंतर आग विझवण्यात यश आले. परंतू तोपर्यंत या आगीत दुकानातील तयार कपडे, फर्निचर, कपाट यासह अन्य वस्तू असा ८७ लाख ४९ हजार रूपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला. याबाबत विटा पोलिसांत नोंद झाली आहे.