१२ वी च्या हॉल तिकिटांमध्ये येड्यांचा कारभार …!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – १० वी आणि १२ वी हे दोन वर्षे विद्यार्थ्यांची दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण मानले जातात. यंदाची १२ वी ची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यंदा पहिल्यांदाच १२ वी च्या परीक्षांचे हॉलतिकीट ऑनलाईन देण्यात आले. मात्र या हॉल तिकिटांमध्ये भरमसाठ चुका असल्यामुळे विद्यार्थ्यांना ऐन परीक्षा तोंडावर आली असताना हॉल तिकिटावरील चुका दुरुस्ती करण्यासाठी खेटे मारावे लागत आहेत. तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा तोंडावर आली असताना परीक्षा हॉल तिकीटांतील चुकांचा सावळागोंधळ समोर आला आहे.
दुरुस्तीसाठी आकारले जात आहेत पैसे 
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदा प्रथम ऑनलाइन पद्धतीने हॉलतिकीट देण्यात आले मात्र या हॉलतिकिटांवर विद्यार्थ्याचे नाव, विषय, परीक्षा माध्यम याविषयी असंख्य चुका झाल्या आहेत. या चुकांच्या दुरुस्तीसाठी अभ्यास सोडून कॉलेजांत खेटे मारणाऱ्या विद्यार्थ्यांकडून काही कॉलेज एका चुकीच्या दुरुस्तीसाठी ५० ते २०० रुपये घेत असल्याचे समोर आले आहे. अभ्यास अंतिम टप्प्यात असतानाच विद्यार्थ्यांचा बराचसा वेळ हॉलतिकिटावरील चुका दुरुस्त करण्यात वाया जात आहे. काही विद्यार्थ्यांच्या नावात चुका असून परीक्षेचे माध्यम, विषयांतही चुका आहेत. काही विद्यार्थ्यांची सही आणि फोटोही हॉलतिकिटावर दिसत नाही, अशा तक्रारी विद्यार्थी भारतीच्या कार्याध्यक्षा साक्षी भोईर, जितेश पाटील, सलोनी तोडकर, मंजिरी धुरी यांनी मुंबई विभागीय शिक्षण मंडळाकडे केल्या आहेत.
सर्व महाविद्यालयांना लेखी आदेश दिले असून दुरुस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊ नयेत, असे सर्व कॉलेजांना कळविले आहे. पैसे घेताना आढळल्यास कारवाई केली जाईल. – शरद खंडागळे, सचिव, मुंबई विभागीय शिक्षण मंडळ.

नेट प्रमाणेच आता सेट परीक्षेतही बदल