आम्ही CM उध्दव ठाकरेंसोबत : अजित पवार

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – आम्ही सर्वजण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. महाविकास आघाडी एक आहे, विविध विषयांवर वेगवेगळी मते असू शकतात मात्र राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलो असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच आज महाविकास आघाडी मजबूत असल्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत.

अजित पवार म्हणाले, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे चर्चेतून एकोप्याने काम करत आहेत. त्यामुळे कोणतेही काम करताना अडचण येणार नाही. त्यामुळे कोणीही शंका घेण्याचे अजिबात कारण नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

सोमवारपासून (दि.24) राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत असून 6 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. एनआरसी आणि एनपीआरच्या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी जी भूमिका मांडली आहे तिच भूमिका आमच्या सर्वांची आहे. पक्षाचे प्रमुख या नात्याने पवार साहेब जे मत मांडतील तेच पक्षाचे व आम्हा सर्वांचेही मत असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.