मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षांची काढली समजूत, दिले ‘हे’ मोठे आश्वासन

'हे' नेते 'वर्षा'वर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणूकीत तिकीट न मिळाल्यामुळे काही नेते नाराज झाले आहेत. तर मित्रपक्षांपैकीच काहीजण जागावाटपावरून नाराज आहेत. या नेत्यांनी आता थेट मुंबईत ‘वर्षा’वर धाव घेतली आहे. महादेव जानकर, रामदास आठवले, विनायक मेटे, सदाभाऊ खोत यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. साहजिकच ही बैठक जागावाटपासंदर्भात असणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार महादेव जानकर, रामदास आठवले, विनायक मेटे, सदाभाऊ खोत यांची मुख्यमंत्र्यांसोबत ‘वर्षा’वरील बैठक संपली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चौघांना सध्या नाही मात्र,विधानसभेत मित्रपक्षांना सन्मानजनक जागा मिळतील, असं आश्वासन दिलं आहे अशी माहिती महादेव जाणकर यांनी दिले आहे.

दरम्यान, महादेव जानकर यांना आगामी लोकसभेसाठी उमेदवारी दिली नाही त्यामुळे ते नाराज आहेत. तसेच भाजप -शिवसेना युतीमध्ये रामदास आठवले यांच्या ‘रिपाई’चा विचार करण्यात आला नाही असे सांगत आठवले यांनी नाराजी व्यक्त केली होती. रामदास आठवले यांनी ईशान्य मुंबईच्या जागेची मागणी केली होती. मात्र, आम्ही शब्द दिल्यामुळे भाजपची साथ सोडणार नाही असे देखील आठवले यांनी स्पष्ट केले होते.

तिकडे पश्चिम भागात स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना आणखीन एक धक्का बसला आहे. रयत क्रांती शेतमजूर संघटना बरखास्त करण्यात आली आहे. त्याबरोबरच शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील संघटनेच्या अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे सादर केले आहेत. त्यामुळे सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेला खिंडार पडले आहे.