MPSC : 506 उमेदवारांच्या नियुक्तीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी ; संभाजीराजेच्या पुढाकाराने परीविक्षाधीनांची दीड वर्षाची प्रतिक्षा संपली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गुणवत्तेच्या जोरावर पात्र ठरलेल्या राज्यभरातील उपजिल्हाधिकारी, अपअधीक्षक, तहसीलदार अशा ५०६ उमेदवारांच्या नियुक्तीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या महाजनादेश यात्रा सुरु असताना मान्यता दिली आहे. महाजनादेश यात्रेत उपस्थित राहण्याऐवजी संभाजीराजे मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांना या प्रश्नांवर भेटीस प्राधान्य दिल्याने याची चर्चा झाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घातल्यामुळे गेल्या दीड वर्षापासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या या अधिकाऱ्यांचा प्रश्न सुटला आहे. त्यांच्या एकत्रित परीविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत त्या लवकरच रुजू करुन घेतले जाणार आहे. जर मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव मान्य केला नसता तर येत्या दोन दिवसात आचारसंहिता लागल्यावर त्यांना पुढचे सरकार येईपर्यंत वाट पाहण्याची वेळ आली असती.

राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेच्या वर्ग-१ व वर्ग-२ या पदासाठी २०१७च्या परीक्षेत ३७७ व २०१८च्या परीक्षेत १२९ उमेदवार उत्तीर्ण झाले होते. मात्र, यासंबंधी शिल्पा कदम यांनी समांतर आरक्षणाच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली. त्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने चुकीचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याने खंडपीठाने नियुक्तीला स्थगिती दिली होती. न्यायालयाच्या निकालानंतर नियुक्तीचा प्रस्ताव सादर होऊनही मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळण्यात दिरंगाई होत होती.

त्यामुळे निराश झालेल्या उमेदवारांनी सोमवारी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांना भेटून व्यथा मांडल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा कोल्हापूरात असताना त्यात खासदार संभाजीराजे उपस्थित नसल्याने चर्चा सुरु झाली. तेव्हा संभाजीराजे हे या उमेदवारांबरोबर मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांची भेट घेण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. त्याच वेळी पात्र उमेदवारांनी तब्बल ५ वेळा मुख्यमंत्र्यांकडेही साकडे घातले होते. याचे वृत्त सर्वत्र चर्चेला जाऊ लागल्याने मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन तो प्रस्ताव मागवून घेतला व त्याला मान्यता दिली.

You might also like