Coronavirus : 26 वर्षांच्या डॉक्टर मुलाचा कोरोनामुळं मृत्यू; मुख्यमंत्री वडिलांचे शब्द ऐकून झाले स्तब्ध

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना योद्धा डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी जे कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी दिवसरात्र झटत आहेत. रुग्णसेवेचा त्यांचा निश्चय कायम ठेवून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी कोरोना जीवावर बेतत असतानाही ते आपले कर्तव्य बजावत राहिले. देशभरात ४२० डॉक्टरांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जीव गमावला आहे. यात दिल्लीतील डॉक्टर १०० आहेत.

दरम्यान, दिल्लीतल्या एका तरुण डॉक्टरचा कोरोनानं मृत्यू झाला. डाॅ. अनस मुजाहिद यांचा काही दिवसांपूर्वीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ते दिल्लीतल्या जीटीबी रुग्णालयात सेवा देत होते. कोरोनाचं निदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनस यांचा जीव गेला. अनस यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मुख्यमंत्री केजरीवालांनी १ कोटी रुपयांचा धनादेश दिला. त्यांचं सांत्वन केलं. त्यावेळी अनसच्या वडिलांचे शब्द ऐकून केजरीवाल थक्क झाले. ‘माझा मुलगा अनस ९ मे रोजी हे जग सोडून गेला. लोकांची सेवा करता करता त्याचं निधन झालं. त्याच्या निधनाचं दु:ख खूप मोठं आहे. पण तो देशाच्या कामी आला याचं समाधान आहे. माझी दोन मुलं इंजिनीयर आहेत. एक मुलगी बीएमएसच्या पहिल्या वर्षाला आहे. अनसप्रमाणेच माझी सगळी मुलं, माझं संपूर्ण कुटुंब देशाच्या कामी येवो,’ अशा भावना अनसच्या वडिलांनी व्यक्त केल्या. अनसच्या वडिलांचे शब्द ऐकून अरविंद केजरीवाल गहिवरले.

‘अवघ्या २६ व्या वर्षी अनस त्यांना सोडून गेला. डॉ. अनस यांचं वय जाण्याचं नव्हतं. पण आपला तरुण मुलगा गमावूनही त्याच्या वडिलांचे विचार अतिशय कौतुकास्पद आहेत. त्याचं लग्नही झालं नव्हतं. त्याच्या मृत्यूला १० दिवस झालेत. पण तरीही त्याचे वडील माझं संपूर्ण कुटुंब देशाच्या कामी यावं अशी इच्छा व्यक्त करत आहेत. मी त्यांना मनापासून सलाम करतो,’ असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.