CM केजरीवाल यांची प्रकृती बिघडली, स्वतःला केलं ‘आयसोलेट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाची राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तब्येत बिघडली आहे. ताप आणि घसा खवखवल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उद्या कोविड-१९ चाचणी केली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, सीएम केजरीवाल यांना रविवारपासून हलका ताप असल्याची तक्रार आहे. यामुळे त्यांनी दुपारी होणारी बैठक देखील रद्द केली होती. त्यांनी स्वत:ला आयसोलेट केले आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल रोज दुपारी दिल्लीतील कोरोना प्रकरणाबद्दल स्वत: माध्यमांशी बोलत आहेत. पण मागील काही दिवसात ताप आणि घसा खवखवल्याची तक्रार आल्यानंतर त्यांनी दुपारी होणाऱ्या सभेपासून स्वत:ला वेगळे केले आहे. दिल्लीतील कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्र्यांची स्वतःची तब्येत बिघडल्याच्या बातम्यांमुळे दिल्ली सरकार आणि आरोग्य विभागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या आरोग्याबाबत खबरदारी घेतली जात आहे. एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री आयसोलेशनमध्ये जाण्याची ही दुसरी घटना समोर आली आहे. यापूर्वी उत्तराखंडमधील मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह ३ मंत्र्यांना सेल्फ क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.

दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे सतत वाढत आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर दर २४ तासांनी जारी होणाऱ्या डेटामध्ये प्रचंड वाढ नोंदवली आहे. रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीत १२८२ प्रकरणे समोर आली होती. दिल्लीत कोरोना संक्रमितांची संख्या २८,९३६ वर पोहोचली आहे. तसेच १७,१२५ एक्टिव रुग्ण आहेत, ज्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एकूण १०,९९९ रूग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत.